उबर चालकाकडून महिलेचा मानसिक छळ
By admin | Published: May 24, 2017 03:18 AM2017-05-24T03:18:28+5:302017-05-24T03:18:28+5:30
खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कॅबचालकाकडून महिलेचा मानसिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कॅबचालकाकडून महिलेचा मानसिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका महिला पत्रकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे समोर आणले आहे. परिणामी खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीच्या महिला सुरक्षिततेच्या धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिला पत्रकाराच्या नातलगाने पुणे विमानतळाहून पाषाण येथे जाण्यासाठी उबर कॅब बूक केली. पाषाण येथे पोहोचल्यानंतर संबंधित कॅबचालकाने त्या महिलेशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्या महिलेने कॅबचालकाला ‘प्रतिसाद’ देणे टाळले. मात्र वारंवार येणाऱ्या व्हॉट्सअॅप संदेशामुळे महिलेने ‘मी तुम्हाला ओळखत नाही. मेसेज का करत आहात,’ असे विचारले. त्या वेळी कॅबचालकाने ‘विमानतळाहून पाषाण येथे सोडलेल्या कॅबचा चालक’ अशी ओळख करून दिली.
महिलेने प्रतिसाद देणे बंद केल्यानंतरही संबंधित कॅबचालक वारंवार मेसेजेस करून त्या महिलेला त्रास देत होता. ही घटना महिलेने उबर कंपनीला कळवली असता; कंपनीने त्या महिलेची माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा उबर कॅबचालकांच्या गैरवर्तणुकीची घटना समोर आली आहे.