शान-कौशिक यांचे ‘खोये पल’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:07 AM2021-03-07T04:07:21+5:302021-03-07T04:07:21+5:30
मुंबई : ईशान त्रिपाठी आणि कौशिक रामचंद्रन या मुंबईतील दोन तरुणांनी तयार केलेले ‘खोये पल’ हे गाणे प्रेक्षकांच्या ...
मुंबई : ईशान त्रिपाठी आणि कौशिक रामचंद्रन या मुंबईतील दोन तरुणांनी तयार केलेले ‘खोये पल’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकतेच या दोघांनी या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्याच्या व्हिडिओचे प्रसारण केले. ‘खोये पल’ हे गाणे हिमालयातील पर्वतरांगांमधील भटकंतीवर आधारित आहे. या गाण्यात हिमालयातील स्पिती व्हॅली येथील बाइक प्रवास चित्रित करण्यात आला आहे.
गाण्याचे बोल आणि चाल व हिमालयातील पर्वतरांगांचे चित्रीकरण प्रेक्षकांच्या मनात हिमालयातील भटकंतीची भावना निर्माण करत आहे.
ईशान त्रिपाठी हे पियानोवादक-संगीतकार आहेत, तर कौशिक रामचंद्रन गायक-निर्माते आहेत. ही जोडी आधी बॉलिवूड कलाकार आदित्य नारायण यांच्यासोबत काम करत होती. तसेच ठाण्याच्या बेंचमार्क स्टुडिओमध्येदेखील त्यांनी काम केले आहे. २०१८ साली हे दोघे एकत्र आल्यानंतर त्यांनी अनेक रॉक बँड, पॉप आणि फ्युजन तयार केले. यानंतर त्यांनी ‘खोये पल’ या गाण्यासाठी तयारी सुरू केली.
लॉकडाउनच्या आधी त्यांनी या गाण्याचे संपूर्ण शूटिंग पार पाडले. या गाण्याचे दिग्दर्शन वरून गाथानी यांनी केले असून कलाकार ध्रुव लोहमी यांनी गाण्यातील बाइकस्वाराची भूमिका साकारली आहे. गाण्याची ध्वनी चित्रफीत २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आली आहे.
या गाण्याविषयी ईशान त्रिपाठी म्हणाले की, आपण आपल्या मर्यादांचा नेहमी विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो. वास्तवात आपण काय करू शकतो याबद्दल आपण जास्त विचार करतो. खोये पल गाण्याच्या माध्यमातून आम्ही कल्पनेच्या पलीकडे विचार केला असून, आमच्या मर्यादांचा विस्तार केला आहे, तर कौशिक रामचंद्रन यांनी सांगितले की, मनातील भव्यता प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी गाणे हे उत्तम माध्यम आहे. आम्ही नेहमी कल्पनांच्या पलीकडे विचार करतो. या गाण्यात आणि व्हिडिओमध्ये आम्ही हिमालयातील सौंदर्य बांधून ठेवले आहे.