शबाना आझमींना अपघातस्थळी मदत करणाऱ्या जवानांचा सुरक्षा महामंडळांच्या महासंचालकांकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 01:28 IST2020-02-04T01:27:56+5:302020-02-04T01:28:01+5:30
राज्यातील नागरिकांच्या हितासाठी सामाजिक जाणिवेतून सुरक्षा महामंडळाचे जवान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे

शबाना आझमींना अपघातस्थळी मदत करणाऱ्या जवानांचा सुरक्षा महामंडळांच्या महासंचालकांकडून गौरव
मुंबई : राज्यातील नागरिकांच्या हितासाठी सामाजिक जाणिवेतून सुरक्षा महामंडळाचे जवान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी. कनकरत्नम यांनी सोमवारी केले. पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातावेळी तातडीने मदतकार्य करणारे जवान विवेकानंद अनिल योगे व संदीप वामन पडळकर यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
अपघाताच्या वेळी दोघा जवानांनी तातडीने धाव घेत आझमी यांना गाडीतून बाहेर काढण्यात तसेच इस्पितळामध्ये तातडीने पोहोचण्यासाठी मदत केली. वेळेत उपचार झाल्याने शबाना आझमी यांच्या प्रकृतीचा धोका टळला. त्यामुळे महासंचालक डी. कनकरत्नम यांनी त्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील मुख्यालयात बोलावून सन्मान केला.
ते म्हणाले, ‘सुरक्षा महामंडळांचे जवान आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या जवानांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’