शाब्बास मुंबई @५५%

By admin | Published: February 22, 2017 05:26 AM2017-02-22T05:26:21+5:302017-02-22T05:26:21+5:30

मुंबईतील २२७ प्रभागांसाठी ७३४३ मतदान केंद्रावर सरासरी ५५ टक्के मतदारांनी मतदान केले़ गेल्या

Shabbas Mumbai @ 55% | शाब्बास मुंबई @५५%

शाब्बास मुंबई @५५%

Next

मुंबई : मुंबईतील २२७ प्रभागांसाठी ७३४३ मतदान केंद्रावर सरासरी ५५ टक्के मतदारांनी मतदान केले़ गेल्या २५ वर्षांत प्रथमच मुंबईत पालिकेसाठी ५० टक्क्यांपेक्षा यंदा जास्त मतदान झाले आहे. २२७५ उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद असून सर्वच राजकीय पक्षांना आता गुरुवारची प्रतीक्षा आहे़ महापालिकेने सातशेहून अधिक केंद्र संवेदनशील जाहीर केली होती़ परंतु मतदार याद्यांचा गोंधळ व काही धक्काबुक्की व बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान सुरळीत पार पडले़
सकाळी ७़३० वा़ मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ९़३० पर्यंत जेमतेम आठ टक्के मतदान झाले होते़ पुढच्या दोन तासांमध्येही त्यात फारसा फरक पडला नाही़ त्यामुळे ११़३० वाजेपर्यंत हा आकडा केवळ १६ टक्क्यांवर पोहोचला़ सकाळच्या वेळेतच मतदार घराबाहेर पडतो, अशी समज खोटी पाडत मतदारांनी दुपारची वेळ गाठली़ यामुळे उमेदवारांना धडकी भरली़ मतदार पाठ फिरवत आहेत असे वाटत असतानाच दुपारी दीडनंतर मतदानाचा आकडा वाढला आणि ३़३० पर्यंत ४१ टक्के मतदान झाले़ त्यानंतर शेवटच्या दोन तासांत मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर वाढत गेली आणि ५़३० वाजता ५२ टक्के मतदान झाले़
तृतीयपंथीही मैदानात.
यावेळीस प्रभाग क्ऱ १६६ मधून प्रिया पाटील या तृतीयपंथी उमेदवारानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली हे या निवडणुकीचे वैशिष्ट्यच़ यामुळे मुंबईतील तृतीयपंथीही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचे चित्र आज दिसून आले़ मुंबईत एकूण ३८१ तृतीयपंथी मतदार आहेत़
तरुण तुर्क म्हातारे अर्क
पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळालेले हौशे नवशे तरुण मतदानासाठी उतरत असल्याचे दरवेळीचे चित्र असते़ मात्र यावेळीस बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र होते़ काही ठिकाणी  ९० ते ९५ वर्षांचे आजी-आजोबा काठीत टेकत आल्याचे दिसून आले़ त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असाच होता़
आणि आजीबाई घसरल्या
मुलुंड पश्चिमेकडील दिनदयाळ उपाध्यय मार्ग मनपा शाळेतील मतदान केंद्रात ज्येष्ठांसाठीची सोय पाहून हसावे की रडावे असे चित्र होते़ प्लास्टिक खुर्चींना टेकूचा आधार देत त्यावर ज्येष्ठांना बसवून केंद्रात नेले जात होते. डम्पिंग रोड येथील रहिवासी असलेल्या सौदाबाई जाधव या ८० वर्षांच्या आजींच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या सोयीसाठी दोन खुर्चींना दोन्ही बाजूंना लाकडी बांबू कापडाने बांधून आजींना बसविण्यात आले़ मात्र बांबू उचलताच त्यांची खुर्ची सरकली. आणि आजी बाई खाली घसरल्या. अखेर एक खुर्ची कमी करुन त्यांना बाहेर सोडण्यात आले.

गोंधळ आणि गैरसोय
मतदार याद्यांचा गोंधळ कायम असताना मतदार केंद्रावरील गैरसोयीने मतदारांच्या अडचणीत भर घातली़ ज्येष्ठांसाठी डोली सेवा व अपंग मतदारांच्या सोयीकरिता रॅम्प बसविण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते़ परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रॅम्पच्या नावाखाली लाकडी फळी टाकण्यात आली होती़

ठाण्यात ५ टक्के वाढ
ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरात ४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाण्यातील मतदानात पाच टक्के वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र उल्हासनगरात पुन्हा मतदारांच्या निरुत्साहाचेच दर्शन घडले आहे
 

Web Title: Shabbas Mumbai @ 55%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.