शाब्बास मुंबईकर! पंधरा वर्षांतील सर्वांत कमी आवाजाची दिवाळी; ध्वनीसह वायुप्रदूषण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:37 AM2019-10-30T00:37:48+5:302019-10-30T00:38:41+5:30

मुंबईकरांची पर्यावरणपूरक दिवाळी, जनजागृतीला मिळाले यश

Shabbas Mumbai! Diwali with the lowest volume of fifteen years; Air pollution levels decreased with noise | शाब्बास मुंबईकर! पंधरा वर्षांतील सर्वांत कमी आवाजाची दिवाळी; ध्वनीसह वायुप्रदूषण घटले

शाब्बास मुंबईकर! पंधरा वर्षांतील सर्वांत कमी आवाजाची दिवाळी; ध्वनीसह वायुप्रदूषण घटले

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे. ‘आवाज’ फाउंडेशनसह ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन’ समिती आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर मुंबईकरांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विशेषत: लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतशबाजी होते. मात्र या वेळी मुंबईकरांनी पर्यावरणाचे भान जपत पर्यावरणपूरक दिवाळीवर भर दिला आहे.

या वर्षी आवाजाची मर्यादा ११२ डेसिबल होती़ २०१० व त्याआधी आवाजाची पातळी १४५ डेसिबलच्या वर असायची़ दणक्यात फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी होतच नाही, असा काहींचा समज असतो. परंतु काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनिप्रदूषणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून त्याला आता कुठे यश आले, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वांत शांत दिवाळी ही या वर्षी साजरी झाल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे.

फटाक्यांचा वापर कमी
शाळा-महाविद्यालयांमध्ये सतत फटाक्यांसंदर्भात करण्यात येणाऱ्या जनजागृतीचाही परिणाम दिसला. पहिली आंघोळ आणि लक्ष्मीपूजनानंतरही उडवल्या जाणाºया फटाक्यांचा आवाज काहीसा क्षीण झाल्याचे जाणवले. फटाक्यांचे प्रमाण कमी झाले असून हा बदल मुंबईच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. म्हणून प्रदूषणाबद्दलही सातत्याने जनजागृती केली तर हवामान बदलाच्या विरोधात लढण्यासाठीही उद्याच्या पिढीमध्ये जागृती निर्माण होईल.

हवेची गुणवत्ता चिंताजनक
दिल्लीत या वर्षी फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी असल्याची नोंद स्कायमेटने केली आहे. मात्र, दिल्ली, नोएडा, गुरूग्राम, गाजियाबाद, फरिदाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे. दिल्लीच्या वातावरणात पीएम २.५ आणि पीएम १० प्रदूषण कणांची संख्या हवेमध्ये अधिक आहे. विषारी कण हवेमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहेत.

बाजारपेठा सजल्या
फटाके, कपडे, घराच्या सजावटीचे व रोशणाईचे साहित्य, गोडाधोडाचे खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू खरेदी-विक्रीसाठी मुंबईतील बाजारपेठा सजल्या होत्या. ग्राहकांच्या हातात या वर्षी जरी पैसा कमी असला तरी खरेदीसाठी बाजारात झुंबड उडालेली दिसून आली.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी असल्याने मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होते.

आतापर्यंतचा अनुभव पाहता यंदाची दिवाळी शांततेत झाली. त्याशिवाय लोक आता दिवाळी दणक्यात साजरी करताना फटाक्यांचा वापरही कमी करीत आहेत. यंदा मुंबईत मरिन ड्राइव्ह जिमखाना आणि दक्षिण मुंबईत फटाक्यांचा सर्वाधिक आवाज होता. मुंबईत रात्री १०.४५ वाजेपर्यंत फटाके फोडले गेले. मात्र सव्वादहा वाजेपर्यंत त्यांचे प्रमाण कमी होते. २०१० पर्यंत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे आवाज असायचे. या फटाक्यांचा आवाज कधीकधी तर १४५ डेसिबलपर्यंत जायचा. - सुमेरा अब्दुलाली, सर्वेसर्वा, आवाज फाउंडेशन

Web Title: Shabbas Mumbai! Diwali with the lowest volume of fifteen years; Air pollution levels decreased with noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.