पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आरे कॉलनीत शबरी महोत्सवाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 05:44 PM2024-02-27T17:44:14+5:302024-02-27T17:44:41+5:30
मंत्री लोढा यांनी आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादरीकरणामध्ये स्वतः सहभाग घेतला.
मुंबई: 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हाच्यावतीने आरे कॉलनीतील आदर्श नगर येथे आयोजित शबरी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनीमध्ये देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेल्या आदिवासी स्वातंत्र्य योद्धांचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा जपण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंत्री लोढा यांनी आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादरीकरणामध्ये स्वतः सहभाग घेतला.
२७ व २८ फेब्रुवारी २०२४, रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये वैदू संमेलन, महिला संमेलन, आदिवासी नृत्यांचा आविष्कार तसेच आदिवासी पूजा पद्धती अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नलिनी बुजड, सुरेखा खुटे, माजी नगरसेविका प्रीती सातम, प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण, मॅगसेसे अवॉर्ड विजेते चैतराम पवार, तालुक्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार, अभ्यासक व प्राध्यापक शरद शेळके, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पंकज पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.