मुंबई : विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट २००८ खटल्यातील आरोपींचा कबुलीजबाब व साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती हरविल्याने त्यांच्या छायांकित प्रती दुय्यम पुरावे म्हणून स्वीकारायला नको होते, असे मत उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले.एनआयएने आरोपींच्या कबुलीजबाबाच्या व साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती हरविल्याचे सांगितले असले तरी त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या छायांकित प्रती या मूळ कागदपत्रांवरूनच काढल्या आहेत, हे एनआयएला सिद्ध करण्यास विशेष न्यायालयाने सांगितले नाही, असे निरीक्षण न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने नोंदविले. ‘साक्षीपुराव्यांच्या मूळ प्रतींवरून छायांकित प्रती काढल्या कोणी? ज्यांनी त्या काढल्या त्यांना साक्षीदार म्हणून बोलावले का? या प्रतींची विश्वासार्हता निश्चित नसल्याने विशेष न्यायालयाने त्या दुय्यम पुरावे म्हणून स्वीकार करायला नको होता,’ असे न्यायालयाने म्हटले.जानेवारी २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने एनआयएला पुरावे म्हणून साक्षीदारांचे हरवलेल्या जबाबांचा आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या छायांकित प्रती सादर करण्याची परवानगी दिली. याला आरोपी समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात आव्हान दिले.आरोपींचा कबुली जबाब, साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती हरविल्याने एनआयएने छायांकित प्रती पुरावा म्हणून सादर करण्याची परवानगी विशेष न्यायालयाकडे मागितली. त्यावर कुलकर्णीने आक्षेप घेतला. विशेष न्यायालयाने छायांकित प्रती पुरावे म्हणून वापरण्याची परवानगी द्यायला नको होती. कारण मूळ पुराव्यांवरूनच छायांकित केल्या, हे सिद्ध करण्यास पुरावे नाहीत, असे कुलकर्णी याने अपिलात म्हटले आहे.