Join us  

छायांकित प्रतीवरून खटला

By admin | Published: January 03, 2017 4:57 AM

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्यातील काही साक्षीदारांच्या जबाबाच्या व अन्य काही कागदपत्रांच्या मूळ प्रती गहाळ झाल्याने विशेष न्यायालयाने या मूळ प्रतींच्या उपलब्ध असलेल्या छायांकित प्रत वापरून खटला

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्यातील काही साक्षीदारांच्या जबाबाच्या व अन्य काही कागदपत्रांच्या मूळ प्रती गहाळ झाल्याने विशेष न्यायालयाने या मूळ प्रतींच्या उपलब्ध असलेल्या छायांकित प्रत वापरून खटला चालवण्याची परवानगी राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) सोमवारी दिली. गहाळ झालेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रतीवरून काढण्यात आलेल्या छायांकित प्रतीचा आधार घेऊन खटला चालवण्याची परवानगी सोमावरी विशेष न्यायालयाने एनआयएला दिल्याची माहिती एनआयएचे वकील अविनाश रसाळ यांनी दिली. गहाळ झालेल्या कागदपत्रांत काही साक्षीदारांचे जबाब, दोन आरोपींचा कबुलीजबाब व अन्य काही महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे खटल्याला सुरुवात होण्यापूर्वीच आम्ही मूळ कागदपत्रांवरून काढण्यात आलेल्या छायांकित प्रतींचा वापर खटल्यादरम्यान पुरावे म्हणून करण्याची परवानगी विशेष न्यायालयाकडे मागितल्याचे रसाळ यांनी सांगितले.बचावपक्षाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला मात्र न्या. श्रीपाद टेकाळे यांनी एनआयएनची विनंती मान्य केली. न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे एनआयए न्यायालयाकडे उपलब्ध मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचा वापर करण्याची परवानगी एनआयएला मिळाली आहे. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेली काही महत्वाची कागदपत्रे गहाळ झाली. ही कागदपत्रे शोधण्यासाठी एनआयने तीन पथके कामाला लावली. त्यात न्यायालयाच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तरीही ही कागदपत्रे एनआयएनेच्या हाती लागली नाही. त्यामुळे एनआयएने हरवलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवरच खटला चालवण्याचा निर्णय घेतला. आरोपींचे हरवलेले कबुलीजबाब दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवण्यात आलेले होते. त्यामुळे त्याची प्रत न्यायालयासह बाचावपक्षांच्या वकिलांकडेही उपलब्ध आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिखू चौक येथे कमी तीव्रतेचे दोन बॉम्बस्फोट झाले. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. याप्रकरणी एटीएसने डझनभर लोकांना ताब्यात घेतले. २०११ मध्ये हे प्रकरण एनआयकडे वर्ग करण्यात आले. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)