८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:39 AM2023-09-27T11:39:09+5:302023-09-27T11:39:26+5:30

मुंबई उपनगरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवलीतील गोराई-२ येथील एकता सेवा मित्र मंडळाच्या (ट्रस्ट) नवसाचा राजा

Shadu clay idol weighing 800 kg Bappa of Ekta Seva Mitramandal who gives the message of environmental conservation | ८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा

८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा

googlenewsNext

मुंबई :

मुंबई उपनगरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवलीतील गोराई-२ येथील एकता सेवा मित्र मंडळाच्या (ट्रस्ट) नवसाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे २८वे वर्ष आहे. गोराई येथील तरुणांनी एकत्र येऊन १९९६ साली स्थापन केलेल्या या मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. 

सामाजिक बांधिलकी व सलोखा जपणारे अशी ओळख असलेल्या या मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय चाचणी शिबिर, गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शालेय वस्तूंचे वाटप अशा उपक्रमांचे आयोजन होते. तसेच, विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने विविध मैदानी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित होतात. याच स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन गोराईतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.  

या मंडळात कोणीही पदासाठी किंवा स्वत:साठी काम न करता केवळ मंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी दिवस-रात्र झटतो. विशेष म्हणजे येथे पुरुष कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यकर्त्याही तेवढ्याच जोमाने योगदान देतात. या मंडळाच्या बाप्पाची मूर्ती ५ फूट १ इंच उंचीची शाडू मातीची असून वजन ८०० किलो आहे. पर्यावरणपूरक शाडू मातीचा हा उपनगरातील पहिला गणपती असल्याचे या मंडळाच्या वतीने सांगितले जाते. मंडळाचे अध्यक्ष विनोद राजशिर्के, सचिव नीलेश पाटील व खजिनदार बाळासाहेब पालवे यांच्यासह सर्व कार्यकर्ते यशस्वीपणे सामाजिक उपक्रम राबवतात.

कोरोना महामारीदरम्यान एकता मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हातभारही लावला. पर्यावरणाला हानी न पोहोचवण्याच्या हेतूने २०२० पासून येथे शाडू मातीची मूर्ती स्थापन करण्यास सुरुवात झाली. शाडू मातीची मूर्ती असूनही बाप्पाचे आगमन व विसर्जन कार्यकर्त्यांच्या खांद्यावरूनच होते. तसेच, बाप्पाचे विसर्जनही गोराई खाडीमध्ये न करता मंडळातच साकारलेल्या कृत्रिम तलावात होते. याद्वारे हे मंडळ पर्यावरणाची पूर्ण काळजी घेते.

१ ऑक्टोबरला वैद्यकीय शिबिर
एकता सेवा मित्रमंडळाच्या वतीने १ ऑक्टोबरला मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी समाज विकास केंद्र संस्थेच्या वतीने होणाऱ्या या शिबिरात अनेक आजारांची तपासणी होणार असून जास्तीतजास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Shadu clay idol weighing 800 kg Bappa of Ekta Seva Mitramandal who gives the message of environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.