मुंबईतील मूर्तिकारांसाठी स्वस्त दरात शाडूची माती, कलाकृती ग्रुपचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:44+5:302021-06-01T04:06:44+5:30
मुंबई : मुंबईतील गणेश मूर्तिकारांसाठी आता स्वस्त दरात शाडूची माती उपलब्ध होणार आहे. यासाठी कलाकृती ग्रुपच्यावतीने पुढाकार घेण्यात आला ...
मुंबई : मुंबईतील गणेश मूर्तिकारांसाठी आता स्वस्त दरात शाडूची माती उपलब्ध होणार आहे. यासाठी कलाकृती ग्रुपच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या ग्रुपचे सदस्य थेट गुजरातमधून शाडूची माती आणून मुंबईतील मूर्तिकारांना ती स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत.
पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या वर्षागणिक वाढत असताना हल्ली शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनेक मूर्तिकार अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला जास्त प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षी न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदी आणल्यामुळे मूर्तिकारांची तारांबळ उडाली होती. अचानक शाडूच्या मातीची मागणी वाढल्यामुळे मोठ्या मूर्तिकार कारखानदारांना शाडूची माती मिळाली नाही. त्यामुळे शेवटी त्यांना पीओपीच्या मूर्ती बनवूनच विकणं भाग पडलं.
सरकारने या सर्व मूर्तिकारांना शाडूची माती वाजवी दरात उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण तसे झालेले नाही. शेवटी पीओपीचाच वापर झाल्यामुळे पीओपीच्या वापरावर बंदी आणून काहीच साध्य झाले नसल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाचा प्रकोप कायम असल्याने येणाऱ्या गणेशोत्सवात सरकारने पुन्हा शाडूच्या मूर्तींची घोषणा केली तर पूर्वनियोजन म्हणून मुंबईतील कलाकृती ग्रुपने चक्क गुजरातमधून शाडूची माती आणण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईतील गणेश मूर्तिकारांना शाडूची माती स्वस्त दरात आणून द्यायचा उपक्रम मुंबईतील कलाकृती ग्रुपचे सत्यविजय कांबळी, दिनेश दाभोळकर, मनीषा पाटणकर, श्रेयश वारणकर, प्रदीप मुणगेकर व नीळकंठ राजम करीत आहेत.
गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला असताना सरकारच्या वतीने कोणतेच आदेश आलेले नाहीत. गणेशोत्सवासाठी लागणारा मंडप व गणेश मूर्तीची उंची याबद्दल अद्याप कोणतीच नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने नियमावली जाहीर करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळ तसेच मूर्तिकार करीत आहेत. मूर्तिकारांना गणेशोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच वर्षभर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे इतरांप्रमाणे गणेश मूर्तिकारांनादेखील सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कलाकृती ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.