Join us  

शार्दुलचा धक्कादायक पराभव

By admin | Published: February 03, 2016 2:36 AM

स्वप्निल धोपडेविरुद्ध बरोबरी मान्य केल्यानंतर ग्रँडमास्टर आणि संभाव्य विजेत्या शार्दुल गागरेला इंटरनॅशनल मास्टर जी.ए. स्टॅनी विरुद्ध अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले

मुंबई : स्वप्निल धोपडेविरुद्ध बरोबरी मान्य केल्यानंतर ग्रँडमास्टर आणि संभाव्य विजेत्या शार्दुल गागरेला इंटरनॅशनल मास्टर जी.ए. स्टॅनी विरुद्ध अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत एकच खळबळ माजली. या धक्कादायक पराभवामुळे शार्दुल ४.५ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. त्याचवेळी विजयी घोडदौड कायम राखलेल्या स्टॅनीने सर्वाधिक ६ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने वांद्रे-कुर्ला संकुलातील (वांद्रे) सेंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेची सहावी फेरी शार्दुलच्या धक्कादायक पराभवाने गाजली. दोन्ही खेळाडूंनी सावध सुरुवात करून एकमेकांच्या चालींचा अंदाज घेतल्यानंतर, शार्दुलने आपल्या आक्रमक चाली रचल्या. या वेळी स्टॅनीनेदेखील जोरदार प्रत्युत्तर देताना शार्दुलला गोंधळून टाकले. यामुळे शार्दुलकडून झालेल्या माफक चुकांचा फायदा घेत स्टॅनीने दिमाखदार विजय नोंदवत सर्वांचे लक्ष वेधले.स्टॅनीने अग्रस्थान मिळवले असून स्वप्निल व हिमल गुसैन यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तरीत्या द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. स्वप्निलने अक्षत खंपारियाचा (४.५) सहज पाडाव केला, तर हिमलने चुरशीच्या झालेल्या सामन्यात दिनेश शर्माचे (४) कडवे आव्हान परतावून लावले. अन्य अनपेक्षित लढतींमध्ये मत्ता विनय कुमार याने लक्षवेधी खेळ करताना इंटरनॅशनल मास्टर अनुप देशमुखला नमवण्याची कामगिरी केली. तर भाविक भारांबे याने जबरदस्त खेळ करताना इंटरनॅशनल मास्टर हिमांशू शर्माला बरोबरी मानण्यास भाग पाडले. दुसऱ्या ज्युनिअर गटाच्या पाचव्या फेरीत बांगलादेशच्या अव्वल मानांकित फिडे मास्टर मोहम्मद फहाद रहमान याला डी. गुकेशविरुद्ध बरोबरी मान्य करावी लागली. मोहम्मदने केलेल्या आक्रमक चालींना गुकेशने दमदार संरक्षणाच्या जोरावर रोखले. यासह गुकेशने मोहम्मदसह प्रत्येकी ४.५ गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले असून त्यांच्यासह आदित्य मित्तल, मेंडोंंका ल्यूक आणि बी. श्रीराम यांनीदेखील प्रत्येकी ४.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली. (क्रीडा प्रतिनिधी)