Join us

Aryan Khan: मुंबईत क्रूझवरील हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलाचा ताब्यात, NCBकडून कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 9:55 AM

Aryan Khan: मुंबई लगतच्या समुद्रात एका मोठ्या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला

Aryan Khan: मुंबई लगतच्या समुद्रात एका मोठ्या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला. यात १० हून अधिक बड्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खान याची एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या १० व्यक्तींमध्ये आर्यन खान याचाही समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली जात आहे. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. पण अद्याप त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही व अटक केलेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं. याशिवाय ड्रग्ज पार्टीच्या ६ आयोजकांना समन्स धाडण्यात आले आहेत. 

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून माहिती गोळा केली जात आहे. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटची आणि मेसेजेसची चौकशी केली जात आहे. या क्रूझ पार्टीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या तीन तरुणींनाही एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्यांचीही चौकशी केली जात आहे. या तीनही बड्या उद्योजकांच्या मुली असल्याचं सांगितलं जात आहे. 

दरम्यान, आर्यन खान यानं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आपल्याला पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावलं होतं. त्याच्याकडून क्रूझवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नव्हती. याशिवाय माझ्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावलं होतं, अशी माहिती त्यानं चौकशीत दिली आहे. 

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये ड्रग्ज लपवून आणलं होतं.

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोशाहरुख खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी