आर्यन खानचे एनसीबी कार्यालयाचे खेटे वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:54 PM2021-12-16T12:54:52+5:302021-12-16T12:55:09+5:30

जामीन अर्जातील उपस्थितीबाबत घाललेली अट उच्च न्यायालयाने केली शिथिल

shah rukh khan son Aryan Khans NCB office attendance was saved court | आर्यन खानचे एनसीबी कार्यालयाचे खेटे वाचले

आर्यन खानचे एनसीबी कार्यालयाचे खेटे वाचले

Next

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी व बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला दर आठवड्याला शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट जामीन अर्जात घालण्यात आली होती. आता या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी कार्यालय करत असल्याने त्याला दर आठवड्याला शुक्रवारी मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची गरज नाही, असे म्हणत न्यायालयाने आर्यनच्या जामीन अटीत सुधारणा केली.

आर्यन खान याला जामीन मंजूर करताना न्या. नितीन सांब्रे यांच्या एकलपीठाने त्याला दर आठवड्याला शुक्रवारी मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. ‘गरज असेल तेव्हा अर्जदाराने (आर्यन खान) दिल्लीच्या एनसीबी कार्यालयात उपस्थितीत राहावे. मात्र, त्यापूर्वी एनसीबीने अर्जदाराला ७२ तासाची नोटीस बजवावी,’ असे न्या. सांब्रे यांनी म्हटले.  तसेच न्यायालयाने आणखी एका अटीत अंशत: सुधारणा केली. मुंबई बाहेर जाताना आर्यनला त्याच्या ठावठिकाण्याची माहिती एनसीबीला देण्याचीही अट न्यायालयाने घातली होती. मात्र, आर्यन दिल्लीला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी जात असेल तर त्याला तपास यंत्रणेला ठावठिकाण्याची माहिती देण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. क्रूझ ड्रग्जप्रकरणी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

गेल्याच आठवड्यात आर्यनने जामीन अटी शिथिल करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. त्यामुळे मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करू नये. एसआयटी जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा तिथे हजर राहू, असे आर्यन खानने अर्जात म्हटले आहे.  त्यावर एनसीबीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी तपास यंत्रणेची यावर हरकत नसल्याचे म्हटले. एसआयटीने समन्स बजावल्यावर अर्जदाराने मुंबई किंवा दिल्ली एनसीबी कार्यालयात हजर राहावे, असे शिरसाट यांनी म्हटले.

Web Title: shah rukh khan son Aryan Khans NCB office attendance was saved court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.