Join us

शहा-उद्धव एकत्र येणे अशक्य

By admin | Published: April 09, 2017 2:37 AM

ठाण्यात होणाऱ्या एकोणतिसाव्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे एकत्र येणार

ठाणे : ठाण्यात होणाऱ्या एकोणतिसाव्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे एकत्र येणार नसल्याचे समजते. आयोजकांनी दोघांना उद्घाटनाच्या सोहळ्याला बोलावले असले, तरी ठाकरे हे समारोपाच्या सत्राला हजर राहतील, असे संकेत स्थानिक शिवसेना नेत्यांनी दिले.ठाण्यात गडकरी रंगायतन येथे २१ ते २३ एप्रिलदरम्यान होणाऱ्या सावरकर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शहा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजीच ठाकरे यांनादेखील आमंत्रण आहे. शहा हजर असताना ठाकरे उपस्थित राहिले, तर आयोजकांपासून मीडियापर्यंत साऱ्यांचे लक्ष शहा यांच्याकडेच राहील, त्यामुळे ठाकरे हे समारोपाला येतील, असे शिवसेना नेत्यांनी आयोजकांना कळवले आहे.गेले काही महिने महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना यांच्यात शेतकरी कर्जमाफीपासून खासदार गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदीपर्यंत अनेक विषयांवरून वारंवार खटके उडत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती न करण्याचा निर्णय शहा यांच्या सूचनेवरून घेतला गेला. या निवडणुकीत भाजपाने संपूर्ण ताकद लावून शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला. उल्हासनगरातील शिवसेनेची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. त्यामुळे शिवसेनेची निवडणुकीत गोची करण्याच्या सर्व खेळी या शहा यांच्या सूचनेवरून खेळल्या जातात, हे सेना वर्तुळात बोलले जात आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून असलेल्या असंतोषाला हवा देण्याचे काम भाजपाचे स्थानिक नेते शहा यांच्याच इशाऱ्यावरून करीत आहेत, असे शिवसेनेच्या मंत्र्यांचे मत आहे. शिवसेनेत फूट पाडून सरकार स्थिर करण्याच्या छुप्या हालचाली असो किंवा नारायण राणे यांच्यासारख्या कट्टर शिवसेनाविरोधी नेत्याला चुचकारण्याचे राजकारण हे ठाकरे यांच्या आक्रमकतेला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. साहजिकच, शहा-ठाकरे यांना सावरकरप्रेमापोटी एकत्र आणण्याचा आयोजकांचा हेतू असला, तरी राजकारणातील दुराव्यामुळे तो सफल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. (प्रतिनिधी)भाजपा नेत्यांची घुसखोरीसावरकर संमेलनाला शहा येणार असल्याची माहिती समजल्याने भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यात या कार्यक्रमास हजर राहण्याची अहमहमिका सुरू झाली आहे. या कार्यक्रमात घुसखोरी करण्याचे भाजपाच्या अनेक नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न पाहता सावरकरप्रेमींपेक्षा हे भाजपाचेच संमेलन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.