Join us

परभणीचा शाहीद म्हणतो, होय माझे इसिसशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:45 AM

सहा वर्षे कारावासात काढली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इसिस या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतल्याचा आरोप असलेल्या परभणीच्या २९ वर्षीय शाहीद खान या तरुणाने अखेर आपला इसिसशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने शाहीद खान याला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शाहीदने सहा वर्षे कारागृहात घालविल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याची कबुली देणारा हा दुसरा आरोपी आहे. यापूर्वी ६ मे रोजीही सिव्हील कॉन्ट्रॅक्टर नासेर बिन यफाई चाऊस यानेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि न्यायालयाने त्यालाही सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात अद्याप एकाही साक्षीदाराने साक्ष  नोंदविलेली नाही. अन्य दोन आरोपींवरील खटला सुरूच राहणार आहे. शाहीद खानने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती एनआयएने न्यायालयाला केली. त्यावर खानने न्यायालयाला दया दाखविण्याची विनंती केली. आधीच सहा वर्षे कारागृहात काढली आहेत.  आतापर्यंत कारावासात काढलेल्या वर्षांमध्येच त्याची शिक्षा पूर्ण होईल, असे खानच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

२०१६ मध्ये एटीएसने नासीर आणि फारुख इसिसचे सदस्य असल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. नासीर हा इसिस व भारताने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता, असा आरोप एटीएसने केला आहे. नासीर फारुखला बॉम्ब व सुधारित स्फोटक उपकरणे म्हणजेच आयइडी बनविण्यास सहकार्य करणार होता आणि रमझानवेळी स्फोट करण्याचा त्यांचा विचार होता, असा आरोप एटीएसने या दोघांवर केला आहे. त्यानंतर खान, इक्बाल, मोहम्मद रईसउद्दीन यांनाही अटक करण्यात आली.

 

 

टॅग्स :परभणीइसिसदहशतवाद