Join us

शाहिदची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या खुनातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या खुनातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यामुळे न्यायालयाने त्याला १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी राबोडीमध्ये गोळीबार झाला होता. त्या वेळी शाहिदने मोटारसायकल चालविली होती. त्याच्यामागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने जमील यांच्यावर गोळीबार केल्याची बाब तपासात समोर आली होती. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जमील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने राबोडीमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडून करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने राबोडीतून २५ नोव्हेंबर रोजी शाहिद शेख याला खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर दोन वेळा त्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली होती. त्याच्या कोठडीची मुदत ८ डिसेंबर रोजी संपली. त्यामुळे मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून आणखी एक दिवस वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी ठाणे पोलिसांनी केली. तपास अपूर्ण आहे. शाहिदच्या साथीदारांचा शोधही बाकी आहे. तसेच खुनासाठी वापरलेले रिव्हॉल्व्हरही मिळालेले नाही. या सर्व बाबी पुन्हा पोलिसांनी न्यायालयासमोर मांडल्या. मात्र, जवळपास १४ दिवस पोलीस कोठडी दिली असल्याचे सांगत, पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे शाहिदची मंगळवारी अखेर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. गरज पडली तर न्यायालयाच्या परवानगीने शाहिदची कारागृहात जाऊन चौकशी करण्यात येईल, असेही तपास पथकातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.