शाहीर साबळे अनंतात विलीन
By admin | Published: March 22, 2015 01:08 AM2015-03-22T01:08:01+5:302015-03-22T01:08:01+5:30
शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता दादर, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता दादर, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्ययात्रेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. परळ येथील आंबेकर नगरात पोलिसांच्या बॅण्डपथकाने त्यांना मानवंदना दिली. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा निघाली. भोईवाडा, दादर टी. टी., वीर कोतवाल उद्यान, न. चिं. केळकर मार्गावरून अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. शिवाजी
मंदिर येथे मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज्य शासनाच्या वतीने सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, अंकुश चौधरी यांनी शाहिरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कारावेळी खासदार राहुल शेवाळे, रामदास आठवले, महापौर स्नेहल आंबेकर, माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ, मनसे नेते बाळा नांदगावकर, मधुकर नेराळे, शाहीर नंदेश उमप आदी उपस्थित होते. या प्रसंगी तावडे यांनी शाहिरांच्या नावाने
पुरस्कार देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.