शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:41 AM2023-12-06T09:41:42+5:302023-12-06T09:44:05+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी देशासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी देशासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. तीनेक दिवसात हा आकडा लाखांच्या वर जाईल, असे अनुयायांचे म्हणणे आहे. लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या भीमाच्या लेकरांना सेवासुविधा देण्यासाठी प्रशासनही सरसावले आहे. शाहिरांपासून प्रकाशन, विक्रेत्यांसह प्रत्येक क्षेत्रातील दाखल झालेल्या नागरिकांमुळे चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा महासागर लोटल्याचे चित्र आहे.
७२ सालापासून मेजर चैत्यभूमीवर येतात...
पनवेल येथे राहणारे समता सैनिक दलाचे मेजर विजय कांबळे हे १९७२ सालापासून चैत्यभूमीवर येत आहेत. आज पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचा अभिवादनाचा प्रवास सुरूच आहे. मेजर म्हणतात, ७२ सालच्या तुलनेत आज व्यवस्था खूप सुधारली आहे. त्याकाळी काहीच नव्हते. अनुयायी येत होते. विसावत होते. मात्र आता आहेत त्या सेवासुविधा नव्हत्या. आज खूप बदल झाले आहेत. सुरक्षाव्यवस्था चोख आहे. पोलिस मदतीला आहेत. समता सैनिक आहेत. तरुण मोठ्या संख्येने अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. आजचे युग हे टेक्नोसॅव्ही आहे. या युगातील तरुण बाबासाहेबांशी जोडला गेला आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या विचारावर चालतो आहे, हे उल्लेखनीय आहे. जग आज खूप पुढे गेले असून, अनुयायीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत.
मोठ्या स्क्रीन:
शिवाजी पार्कच्या प्रत्येक कोपऱ्यावर मोठया स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर अनुयायांना सूचना करतानाच प्रत्येक गोष्टीची माहिती स्क्रीनवर दिली जात आहे. शिवाय प्लाझा सिनेमा परिसरातही अनुयायांना माहिती देणारी स्क्रीन मांडण्यात आली आहे.
महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादन करताना आपला फोटो लावण्यात येऊ नये, असा संकल्प विश्वशांती सामाजिक संस्थेने केला आहे. संस्थेच्या या संकल्पाला सर्वच स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महापरिनिर्वाण दिनी बॅनरवर केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो असावा. स्वत:चा अथवा इतरांचा फोटो टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांची नवी तुकडी :
मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झालेली महिला पोलिसांची नवी तुकडी शिवाजी पार्कवर बंदोबस्तासाठी आली होती. या नव्या पोलीसांना त्यांचे वरिष्ठ सूचना देत सहकार्य करण्याचे आवाहन करत होते.
शाहीर आणि बाबासाहेब :
शाहीर देवीदास बिहाडे बाबू हे यवतमाळहून चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. शाहीर केवळ एकटेच नाही, तर त्यांची मित्रमंडळी त्यांच्यासोबत आहेत. शिवाजी पार्कमधील एका कोपऱ्यावर या शाहीर मंडळींनी फड जमवला आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव आपल्या शाहिरीतून करतानाच देवीदास आणि त्यांची मित्रमंडळी बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक होण्याचे आवाहन चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्यांना करत आहेत. अधून-मधून ब्रेक घेत गाण्यांवर गाणी गात ही शाहीर मंडळी रसिक प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत.
धम्म आणि अन्नदानाचा मिलाफ :
बौद्ध धम्मात दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर धम्म आणि अन्नदानाचा मिलाफ पहावयास मिळतो. ज्याला ज्या प्रकारे शक्य होईल, तशा माध्यमातून अन्नदान देण्याचा प्रयत्न असतो.
यामध्ये ओएनजीसी, पालिका कामगार संघटना, राष्ट्रीयकृत बँका तसेच राजकीय पक्ष संघटनांकडून अन्नदान, पाणी, सुखा खाऊ दान करताना दिसून येते. त्यामुळे मोठा आधार बाहेरून आलेल्या भीम अनुयायांना आहे.
पुस्तकांवर ८५% सूट :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शिवाजी पार्क येथे माहिती आणि प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आला आहे. स्टॉलमध्ये विभागाच्या योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.
पाली भाषेतील पुस्तके उपलब्ध करण्याची मागणी :
डॉ. आंबेडकरांच्या लेखन साहित्या सोबत तथागत बुद्ध विषयक आणि पाली भाषा पुस्तकांची सर्व धर्मियांकडून जोरदार मागणी आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर मुंबईत विद्यापीठ पाली विभाग, पाली धम्मलिपी अभ्यासक केंद्र तसेच पाली साहित्य स्टॉलची तरुणांकडून विचारणा होताना दिसते.
मोफत आयुर्विमा हवा: भिक्खू संघाची मागणी :
केंद्र सरकारमध्ये हिंदू धर्मातील साधूंना मुख्यमंत्री पदापर्यंत संधी दिली गेली आहे. बौद्ध धम्म गुरूंना माफक सोई सुद्धा नाहीत. देव देश प्रतिष्ठान मुंबईतील ५१ बौद्ध धम्म गुरूंचा विमा काढणार आहेत. त्याच धर्तीवर राज्य सरकराने बौद्ध धम्म गुरूंना मोफत आरोग्य आयुर्विमा तसेच सोई सवलती जाहीर कराव्यात अशी मागणी कार्यध्यक्ष भदंत विरत्न महाथेरो, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर यांनी चैत्यभूमीवर केली.
बॅगेला चेन लावणारे बुलढाण्याहून आले :
दहा वर्षांपासून नियमितपणे लावतात हजेरी लाला काकडे, सचिन काकडे आणि राजू शेळके हे बुलढाण्यातील मलकापूरहून खास चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बॅगेला चेन लावण्याचा व्यवसाय ही मंडळी करत असून, आता दोन ते तीन दिवस ही मंडळी चैत्यभूमीवर असणार आहेत. गेल्या १० वर्षांपासून हे तिघेही चैत्यभूमीवर न चुकता येत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाच चैत्यभूमीवर बॅगेला चेन लावून आपले पोट भरत आहेत. देशासह राज्यभरातून चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या अनुयायांच्या बॅगांची दुरुस्ती करत आहेत.
दोन मोठी निवारागृहे, पण जागा कमी...
शिवाजी पार्कमध्ये महापालिकेच्या वतीने भलीमोठी दोन निवारागृहे उभारण्यात आली आहेत. मात्र येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येला ही निवारागृहे अपुरी पडत आहेत. कारण देशासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल होत आहेत.
सोमवारी सुमारे ५ लाख, मंगळवारीही ५ लाख अनुयायी दाखल झाल्याचा अंदाज अनुयायांनी बांधला आहे. बुधवारी सुमारे ५ लाख अनुयायी दाखल होतील. तीन दिवस मिळून सुमारे १५ लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतील, असा अंदाज अनुयायांनी बांधला आहे.
दोन्ही मोठ्या निवारागृहांत अनुयायी विश्रांती घेत असले तरी येथील जागा कमी पडत आहे. त्यामुळे बहुतांशी अनुयायी निवारागृहाच्या लगत, मैदानात, पार्कच्या कठड्यांवर विसावले आहेत.
पिण्याच्या पाण्याचे टँकर जागोजागी मांडण्यात आले आहेत सरकारी यंत्रणांसह सेवाभावी संस्थाकडून मोफत नेत्र तपासणी सुरु आहे.
स्नानगृह आणि प्रसाधनगृहांची नीटनेटकी व्यवस्था करण्यात आली आहे.
बेस्टकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, जीवनावरील पुस्तकांचे वाटप केले जात आहे.
दिशादर्शक फलक :
दादर रेल्वे स्थानकांपासून शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात विविध यंत्रणांकडून दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. राजगृहाची दिशा दाखविण्यापासून कोणते रस्ते बंद आणि सुरु आहेत ही माहिती देण्यासोबतच कोणती व्यवस्था कुठे आहे? याची माहिती फलकांवर देण्यात आली आहे.
बुद्ध आणि बाबासाहेबांचा पुतळा :
शिवाजी पार्कमध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शिल्पकार विजय बुऱ्हाडे यांनी हे दोन्ही पुतळे साकारले असून, मंगळवारी व्यासपीठावरील सजावटीचे काम दिवसभर सुरु होते. व्यासपीठाभोवती दाखल अनुयायी या पुतळ्यांसोबत छायाचित्रे काढत होते.
माहितीपट, मुलाखत :
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात होणार आहे. तसेच आकाशवाणीवरून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत आणि ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता होणार आहे.