शहापूर : कर्मचारी, वाहक, चालकांच्या रिक्त पदांमुळे जाणवणारी कमतरता, उपलब्ध कर्मचाऱ्यांना मर्यादित अधिकार, शहरात कामानिमित्त येणाऱ्यांनी स्वत:ची वाहने ठेवण्यासाठी तसेच आरटीओने कारवाईसाठी जप्त केलेल्या वाहनांसाठी एसटीच्याच जागेत तळ बनविल्याने मुतारी, शौचालयांची अस्वच्छता, याशिवाय शेजारच्या दुकानदारांनी कचरा टाकण्यासाठी अघोषित डम्पिंग म्हणून महामंडळाचीच जागा पसंत केल्याने राज्य परिवहन महामंडळाचे शहापूर आगार समस्यांचे आगार बनले आहे.आरटीओने कारवाईसाठी जप्त केलेले ट्रक, डम्पर, रिक्षा, दुचाकी, ट्रॅव्हल्स बस अशी वाहने गेल्या काही वर्षांपासून एसटी आगारात उभी करून ठेवली आहेत. अशा वाहनांची संख्या सुमारे ५८ इतकी आहे. शिवाय, रोज शहरात कामानिमित्त येणारे वाहनचालक वाहने उभी करण्यासाठी सुरक्षित वाहनतळ म्हणून एसटीच्या परिसराचा वापर करीत आहेत. वास्तविक, हे वाहनतळ नसून एसटीची मोकळी जागा आहे. त्यामुळे एसटीच्या या आगारात एसटी बस कमी, परंतु इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आरटीओने जप्त केलेल्या वाहनांसाठी पूर्वी भाडे आकारले जात होते. मात्र, आता तेही बंद करण्यात आले आहे. मोकळ्या जागेचा वापर भाडेतत्त्वावरील वाहनतळासाठी करावा, अशी योजना होती. काही काळ तसे वाहनतळ ठेकेदाराकडून सुरूही केले होते. परंतु, तेही बंद केल्याने उत्पन्न घटले आहे. ४ लाख रुपयांचे दिवसाचे उत्पन्न असूनही वाहक आणि चालकांच्या कमतरतेमुळे अनेकदा एसटीच्या गावातील तसेच दूरच्या पल्ल्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. शिवाय, प्रवाशांचेही हाल होत आहेत. एसटीचे आगार त्यामुळेच समस्यांचे आगार बनले आहे. (वार्ताहर)
शहापूर एसटी आगार बनला भंगार, कचरा डेपो
By admin | Published: December 04, 2014 11:55 PM