Aryan Khan Arrest Updates: शाहरुखचा आर्यन खानसोबत २ मिनिटांचा संवाद; बापानं पोराला काय दिला सल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:08 PM2021-10-04T12:08:31+5:302021-10-04T12:09:33+5:30
Aryan Khan Arrest Updates: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीत (Mumbai Goa Cruise Drugs & Rave Party) अटक करण्यात आली आहे.
Aryan Khan Arrest Updates: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीत (Mumbai Goa Cruise Drugs & Rave Party) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान याला रविवारी किला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. याच दरम्यान अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या वकीलांच्या माध्यमातून आर्यनसोबत फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.
शाहरुखनं आर्यनसोबत दोन मिनिटं बातचित केली. यात शाहरुखसोबत बोलताना आर्यन रडत होता अशीही माहिती समोर आली आहे. शाहरुखनं आर्यनला संयम ठेवण्याचा सल्ला फोनवरुन दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एनसीबीकडून शाहरुख आणि आर्यनमध्ये संवाद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनकडे एनसीबीला काहीच सापडलेलं नसल्याचा दावा केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यनच्या चौकशीत आणखी काही महत्त्वाची माहिती मिळाली असून आज पुन्हा एकदा आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी एनसीबीकडून करण्यात येण्याची शक्यता बळावली आहे. आर्यन खान यानं आपण गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचंही कबुल केल्याचं सांगितलं जात आहे. याच संदर्भात अधिक चौकशी करण्यास एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. आज पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी संबंधित क्रूझवर तपासासाठी पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. आणखी काही सबळ पुरावे हाती लागतायत का हे पाहण्यासाठी एनसीबीचं पथक क्रूझची झाडाझडती घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
क्रूझवर ड्रग्ज पुरवणाऱ्या श्रेयस नायरला अटक
क्रूझवरील पार्टीत ड्रग्ज पुरवण्याचं काम केलेल्या श्रेयर नायर या ड्रग्ज पेडलरला देखील अटक करण्यात आली आहे. एनसीबीनं काल रात्री छापा टाकून नायरला याला अटक केली आहे. आर्यन खानच्या मोबाइल चॅट्सची तपासणी केल्यानंतर श्रेयस नायर याचं नाव समोर आलं होतं. क्रूझमध्ये एमडीएमए नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ते पुरवण्याचं काम श्रेयस नायर यानं केलं होतं अशी माहिती समोर आली आहे.