शाहरुख खानचा ‘जवान’ ट्विटरवर व्हायरल; शूटिंगच्या वेळेसच काढल्या क्लिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 08:04 AM2023-08-13T08:04:38+5:302023-08-13T08:05:22+5:30
‘जवान’ या चित्रपटातील क्लिप्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पाच ट्विटर हँडलवर व्हायरल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता शाहरुख खान अभिनित ‘जवान’ या चित्रपटातील क्लिप्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्विटरवर व्हायरल झाल्या आहेत. या संबंधात रेड चिलीज एंटरटेनमेंटने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कथित चोरीच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविली असून सांताक्रूझ पोलिस ठाण्यात १० ऑगस्टला या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराने कॉपीराइटचे उल्लंघन झाले, चित्रीकरणादरम्यान रेड चिलीज एंटरटेनमेंटने शूटिंगच्या ठिकाणी मोबाइल फोन आणि रेकॉर्डिंग डिव्हाइसेस आणण्यास मनाई केली होती. मात्र असे असूनही यातील काही सीन शूट करत त्याची क्लिप अनोळखी व्यक्तीने प्रसारित केली. हा सगळा प्रयत्न कंपनी तसेच चित्रपटाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केला गेल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या म्हणण्यानुसार पाच ट्विटर हँडलवर जवान चित्रपटाच्या क्लिप शेअर केल्या गेल्या. त्यानुसार या हँडलर्सना कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली होती.
‘जवान’ हा हिंदीतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, त्याने त्याचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण (विशेष देखाव्यात), प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह शाहरूख खान दुहेरी भूमिकेत आहे. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३७९ (चोरी) आणि ४३(बी) माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत अनोळखी व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.