मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'झिरो' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये प्रचंड बिझी आहे. मात्र, या चित्रपटाचा सेट मुंबईबाहेर असल्यामुळे शाहरूखला बरीच कसरत करावी लागत आहे. मुंबईतील ट्रॅफिकमुळे या सेटपर्यंत पोहोचेपर्यंत शाहरूखला अक्षरश: नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या शाहरूखने आता हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. 'डेक्कन क्रोनिकल'च्या माहितीनुसार, शाहरूख संध्याकाळी सात वाजता घरातून शुटिंगसाठी निघतो आणि सकाळी सहा वाजता परत येतो. 8 एप्रिलपर्यंत शुटिंगचे हे वेळापत्रक कायम राहणार आहे. मात्र, अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे शाहरूखला सेटवर पोहोचायला उशीर होतो. परिणामी पुढील सगळ्याच गोष्टी उशीराने होतात. त्यामुळे शाहरूखने आता सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करायचा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानचा यापूर्वी आलेला 'हॅरी मेट सेजल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. त्यामुळे दिग्दर्शक आनंद राय यांच्या झिरोकडून शाहरूखच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आनंद राय यांनी मध्यंतरी शाहरुखचे कौतुक केले होते. 25 वर्षे इंडस्ट्रीत काम करुनही शाहरूखमध्ये अजूनही एखाद्या लहान मुलासारखी प्रचंड उर्जा भरलेली आहे, असे आनंद राय यांनी म्हटले होते. 'झिरो'मध्ये शाहरूखसोबत अनुष्का शर्मा हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे चाहत्यांना शाहरूखच्या या चित्रपटाची बरीच उत्सुकता आहे.
शाहरूख खान मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळला; सेटवर जाण्यासाठी वापरतोय हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 2:11 PM