शहा यांचे पुस्तक वैद्यकीय तज्ज्ञांसाठी उपयुक्त
By admin | Published: April 19, 2016 03:54 AM2016-04-19T03:54:01+5:302016-04-19T03:54:01+5:30
देशात यकृताचे आजार वाढत आहेत. या आजारांविषयी आणि मुख्यत: ‘लिव्हर सिरॉसिस’च्या उपचाराच्या सोप्या पद्धती समजून घेण्यासाठी डॉ. शरद शहा यांचे पुस्तक शल्यचिकित्सक
मुंबई : देशात यकृताचे आजार वाढत आहेत. या आजारांविषयी आणि मुख्यत: ‘लिव्हर सिरॉसिस’च्या उपचाराच्या सोप्या पद्धती समजून घेण्यासाठी डॉ. शरद शहा यांचे पुस्तक शल्यचिकित्सक, फिजिशियन, वैद्यकीय विद्यार्थी या सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे. या आजारांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याचीही आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.
सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शरद शहा यांच्या ‘प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर सिरॉसिस आॅफ लिव्हर अॅण्ड इट्स प्रोगे्रशन’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राजभवनात राज्यपाल आणि ज्येष्ठ डॉक्टर फारूख उदवाडिया यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन
तथा खासदार विजय दर्डा, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, राजश्री बिर्ला, हर्ष गोयंका, जितेंद्र पालवे, डॉ. दीपक अमरापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शहा यांनी लिहिलेली प्रस्तावना ही अत्यंत सोप्या शब्दांत आहे. ‘लिव्हर सिरॉसिस’ हा आजार प्रतिबंधात्मक असून लवकर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, ही माझ्यासाठी बातमीच आहे, असे
सांगून राज्यपाल म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णांमध्ये कमी होत
असलेला संवाद वाढला पाहिजे. रुग्णांना अनेक चाचण्यांना
सामोरे जावे लागते हेदेखील थांबले पाहिजे.
नियमित तपासण्या तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यकृताचा आजार बरा होऊ शकतो, असे सांगून डॉ. फारूख उदवाडिया म्हणाले, हॅपिटायटिस बी आणि सी चा पॅटर्न बदलत आहे. मद्यप्राशनामुळेही यकृतांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पण, काळजी घेतल्यास हे आजार टाळता येऊ शकतात.
डॉ. दीपक अमरापूरकर यांनी डॉ. शहा यांच्या पुस्तकाची ओळख करून दिली. स्थूलपणा, मधुमेह आणि जास्त प्रमाणात मद्यपान यामुळे ‘लिव्हर सिरॉसिस’सारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. डॉ. शहा यांचे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे डॉ. अमरापूरकर म्हणाले. (प्रतिनिधी)