ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - १९ मे रोजी गुरुवारी औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. शिखरावरुन बेस कॅम्पवर सुखरुप परतल्यानंतर त्याने त्याच्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या.
'१९ मे च्या सकाळी ९.०२ मिनिटांनी मी जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचलो. मी माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर उभा होतो. मी आयुष्याच्या वेगवेगळया टप्यांवर माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पाहिले. मागच्या तीन वर्षांपासून माझे त्यासाठी प्रयत्न सुरु होते. मी एव्हरेस्ट शिखरापासून १०० मीटर अंतरावर असताना मला भरुन आले. माझ्या डोळयात अश्रू तरळले. मी पुढची दहा मिनिटे रडत होतो. माझा भाऊ आणि माझा जवळचा मित्र थुपतेन शर्मा शिखरावर पोहोचताना माझ्यासोबत होता. काय झाले आणि मी काय केले हे मला माहित नाही. पण मी जगातल्या सर्वोच्च स्थानावर उभा होतो,' असा अनुभव रफिकने कथन केला.
'मी स्वत:साठी माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहण केले त्यातून मला आत्मिक समाधान मिळाले. एव्हरेस्टवर पोहोचून तिथे फोटो काढल्यानंतर पुन्हा खाली बेस कॅम्पवर परतण्याची वेळ झाली. वातावरण बदलत होते, वा-याचा वेग वाढत होता. व्यवस्थित, सुखरुप खाली पोहोचून मी माझी मोहिम यशस्वी केली. येणा-या दिवसात माझ्या एव्हरेस्ट प्रवासातील अनेक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या या यशासाठी मी अनेकांचे आभार मानतोट असेही रफिकने सांगितले.