झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या शैलेश राठोड कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:31 PM2019-06-18T21:31:03+5:302019-06-18T21:37:00+5:30
देवळात जातांना अंगावर गुलमोहरचे झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मालाडच्या शैलेश राठोड (38) यांच्या कुटुंबाला मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी दोन लाख रुपयांची आर्थिक मदतीचा हात दिला.
मुंबई - गेल्या शुक्रवारी सकाळी 6.30च्या सुमारास देवळात जातांना अंगावर गुलमोहरचे झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मालाडच्या शैलेश राठोड (38) यांच्या कुटुंबाला मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी दोन लाख रुपयांची आर्थिक मदतीचा हात दिला.राठोड यांना पत्नी व दोन मुली आणि आई वडील आहेत.पालिकेच्या निष्कळजीपणामुळे शैलेश राठोड यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार शेख यांच्याकडे केला.
मालाड पश्चिम येथील एस.व्ही.रोड येथील नाडीयादवाला कॉलनी येथील नवलभ इमारतीत शैलेश राठोड कुटुंबासमवेत ते राहात होते.बिकेसी येथील एका खाजगी कंपनीत ते नोकरीला होते.घरातील ते एकटे कमवते होते.त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मालाड मधील धोकादायक झाडे व त्याच्या फांद्या कापा असे आपण पी उत्तर साहाय्यक पालिका आयुक्त व उद्यान अधिकारी यांच्या निदर्शनास आणले होते.मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे शैलेश राठोड यांना जीव गमवावा लागला असा आरोप त्यांनी केला.तर येथील धोकादायक झाडे व फांद्या तोडा अशी तक्रार मे 2014 व एप्रिल 2017 मध्ये पी उत्तर विभाग कार्यालयात केली होती.पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने दुदैवाने शैलेश राठोड यांचा मृत्यू झाला असा आरोप येथील नागरिकांनी केला.
मालाड पश्चिम मार्वे रोड येथील त्यांच्या कार्यालयात त्यांनी सदर आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाला केली.महापालिकेने त्यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.या प्रकरणी आपण पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेणार आहे.तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात आपण आवाज उठणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना शेवटी दिली.