मुंबई : खराब हवामानामुळे (एअर टर्ब्युलन्स) हेलकावे खाल्लेल्या विमानातील आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर विस्ताराच्या (युके ७७५) या विमानात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
कोलकाता विमानतळापासून ७० नॉटिकल मैल अंतरावर असताना खराब हवामानामुळे या विमानाने हेलकावे खाल्ले. त्यावेळेस विमान सुमारे १७ हजार फुटांवर होते. अचानक विमान हलल्याने तोल जाऊन काही प्रवासी आजूबाजूला आदळले. त्यातील पाच प्रवाशांना किरकोळ इजा झाली, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. विमानाचे तात्काळ कोलकाता विमानतळावर लँडिंग करण्यात आले.
किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर अन्य तिघांना विमानतळ प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यापैकी अनिता अग्रवाल (वय ६१) यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून, त्यांना बेले व्ह्यू रुग्णालयात दाखल केले आहे. तिमिर दास (७७) यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून, त्यांच्यावर चार्णोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुदीप रॉय (वय ३६) यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे.