मुंबई : खराब हवामानामुळे (एअर टर्ब्युलन्स) हेलकावे खाल्लेल्या विमानातील आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर विस्ताराच्या (युके ७७५) या विमानात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
कोलकाता विमानतळापासून ७० नॉटिकल मैल अंतरावर असताना खराब हवामानामुळे या विमानाने हेलकावे खाल्ले. त्यावेळेस विमान सुमारे १७ हजार फुटांवर होते. अचानक विमान हलल्याने तोल जाऊन काही प्रवासी आजूबाजूला आदळले. त्यातील पाच प्रवाशांना किरकोळ इजा झाली, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. विमानाचे तात्काळ कोलकाता विमानतळावर लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना तत्काळ विमानतळ प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेतून नजीकच्या चारनॉक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश असून, त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिला प्रवाशाच्या उजव्या हाताला, तर एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याचे समजते.
या विमानात एकूण ११३ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून, जखमींची नावे आणि अन्य तपशील अद्याप समोर आलेला नाही.
................................