शक्ती कायदा स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्यासाठी प्रकाशझोताप्रमाणे काम करेल - नीलम गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 09:32 PM2021-12-10T21:32:27+5:302021-12-10T21:32:53+5:30
Neelam Gorhe : महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदे विषयक मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले जातात, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
मुंबई : राज्यातील अनेक महिलांना आजही विविध संकटांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचं प्रमाण वाढतंय तरी आजही महिलांना आपल्या अधिकारांची आणि हक्काची जाणीव नाही. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत परंतू या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. महिला कायद्यामुळे महिलांना न्याय मिळाला आहे. महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदे विषयक मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले जातात, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यानिमित्त “महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता ” या विषयावर चर्चा सत्राचा समारोप आज होता. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा नवीन शक्ती कायदा याबाबत चर्चा करण्यात आली, याप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आपण पीडीत महिलेचे काय म्हणणे आहे, हे ऐकले पाहिजे. महिला जेव्हा अन्यायाबाबत सांगत असतात तेव्हा या अन्यायाबाबत कोणत्या कायदयातून आधार मिळू शकतो, याबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत विचार करणे करणे गरजेचे आहे.
प्रस्तावित शक्ती कायद्यांची ठळक वैशिष्टे काय आहेत, याविषयी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शक्ती कायद्यात बलात्कारासोबतच घोर अपराध हे सुद्धा समाविष्ट केले आहे.तसेच समाज माध्यमांमधुन महिलांना धमकावणे व बदनामी करणे बलात्कार, विनयभंग आणि ॲसिड हल्ला बाबत खोटी तक्रार करणे, समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे, हे नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. आरोपींच्या शिक्षांचा कालावधी वाढविला आहे. गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे. फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचविला आहे. या कायदयामुळे महिलांना सुरक्षितपणे जगण्यासाठी न्यायाची शक्ती मिळणार आहे. साक्षीदारांना संरक्षण, मनोधैर्य योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी या सगळ्या मुद्द्याच्या आधाराने शक्ती कायदा हा चांगल्या प्रकारे प्रभावी होऊ शकतो.
या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी केशरी दिवस संस्कृती व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. पोलीस अधिक्षक सोलापूर (ग्रामीण) तेजस्वीनी सातपुते यांनीही महिलांविषयी कायदे याबाबत माहिती देतानाच स्त्रियांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. आश्विनी शिंदे, प्रज्वला,गौतमी धावरे यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभावरी कांबळे यांनी केले तर अनिता शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.