हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेची कारवाई, स्वतःची टोळी करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुन्हा अटक
हत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हे शाखेची कारवाई; स्वतःची टोळी करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश श्रीधर जाधव उर्फ गोट्या (२५) आणि त्याचा साथीदार अंकित नाईकला हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. आकाश स्वतःची टोळी तयार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होता.
२०१३ मध्ये झालेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी त्यावेळी अल्पवयीन आरोपी असलेल्या आकाशला बाल न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर ताे पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. गुन्हेगारी वृत्तीच्या काही तरुणांसोबत ताे आग्रीपाडा, डिलाईल रोड परिसरात दुकानदारांकडून हप्ता वसुली करणे, मारहाण, लूटमार करू लागला.
२०१७ मध्ये आकाशविरुद्ध आग्रीपाडा आणि ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. मात्र, जामिनावर बाहेर पडल्यानंतरही त्याने आपली दहशत निर्माण केली. त्याच्या दहशतीला घाबरून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. अखेर पोलिसांनी त्याला दोन वर्षांसाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून तडीपार केले होते. या कालावधीतही त्याने मुंबईत गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
दरम्यान, वांद्रे पोलिसांच्या हद्दीत २७ फेब्रुवारी रोजी लालमट्टी परिसरात एका व्यक्तीवर आकाश आणि त्याच्या साथीदारांनी विनाकारण डोक्यावर, हातावर चाकूने वार करून पळ काढला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात जखमी झालेली व्यक्ती सायन रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने समांतर तपास सुरू केला. तपासात आकाश आणि त्याचा साथीदार डोंबिवली परिसरात पळून गेल्याची माहिती मिळतात पथकाने दोघांनाही तेथून अटक केली.
* मुंबईत ८ गुन्ह्यांची नाेंद
आकाशविरुद्ध एन. एम. जोशी मार्ग, आग्रीपाडा, आर. ए. के. पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, मारहाण अशा स्वरूपाचे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
* डोंबिवलीत वास्तव्य
पूर्वी आग्रीपाडा येथे राहणारा आकाश उर्फ गोट्या याचे घर एसआरएमध्ये गेल्यानंतर त्याचे कुटुंब भाडेतत्त्वावर भांडुप येथे राहण्यास गेले होते. मात्र, मुलाच्या या कृत्यामुळे कुटुंब डोंबिवलीत रहायला गेले. आग्रीपाडा परिसरात लहानाचा मोठा झालेला आकाश उर्फ गोट्या शक्ती मिल प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आला आणि त्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली. या टाेळीच्या जाेरावर आग्रीपाडा आणि डिलाईल रोड परिसरात गुन्हे करण्यास सुरुवात करून आपली दहशत निर्माण केली होती.
...................