मुंबई : मुंबईसह राज्याचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. परिणामी नागरिकांची उन्हाळे होरपळ होत आहे आणि वाढत्या उन्हाचा फटका पक्षी, प्राण्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीही वाढत्या उन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच प्राण्यांपैकी एक असलेला येथील शक्ती नावाचा वाघ आपल्या पिंंजऱ्यातील छोट्याशा तलावात मनसोक्त जलविहार करत असून, वाढत्या तापमानापासून स्वत:चा बचाव करत आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे प्राणी व पक्ष्यांसाठी पारंपरिक पद्धतीचे पिंंजरे न उभारता, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी नाते सांगणारी दालने उभारण्यात आली आहेत. पूर्वीच्या पिंजऱ्यांना असायचे तसे गज वापरण्याऐवजी दालनांच्या दर्शनी भागात उत्कृष्ट दर्जाची व वैशिष्ट्यपूर्ण मजबूत काचा बसविण्यात आल्या आहेत. यामुळे प्राण्यांना विनाअडथळा बघणे व त्यांचे अधिक चांगले छायाचित्रण करणे शक्य होत आहे. मुक्त पक्षीविहारासह बिबट्यांच्या दालनाच्या सभोवताली जर्मनीहून आयात केलेली गंजरोधक व मजबूत जाळी बसविण्यात आली आहे. तसेच या जाळींमुळे दालनांच्या सौंदर्याला व कलात्मकतेला बाधा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. मुक्त पक्षीविहारात विविध प्रजातींचे १०० पक्षी असून याची कमाल क्षमता २०० पक्ष्यांची आहे. याच ठिकाणी पक्ष्यांना अनुरूप ठरतील अशी विविध प्रजातींची झाडेही आहेत. अशातच आता घाम फोडणारा उन्हाळा सुरू झाला आहे.
परिणामी येथील पक्षी-प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात आली असून, अधिकाधिक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शक्ती नावाच्या वाघाच्या पिंंजºयातील छोट्याशा तलावात भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, हा वाघ सध्या वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी येथे मनसोक्तजलविहार करत आहे.कोल्हा : लबाड आणि संधीसाधू प्राणी अशी ओळख असणारा कोल्हा हा त्याच्या जोडीदाराशी अत्यंत एकनिष्ठ राहतो. एकदा कुटुंब झाले की, कुटुंबासाठीची प्रत्येक गोष्ट नर व मादी दोघे मिळून करतात. अगदी शिकार करणे, जेवण करणे इत्यादी सर्व बाबी ते एकसाथ मिळून करतात. अगदी पिलू झाल्यानंतरही दोघे मिळून आपल्या पिल्लांची एकत्रपणे काळजी घेतात.अस्वल : मध हे आवडते खाद्य असणाºया अस्वलाला कणीस, विविध प्रकारची फळे, किडे आणि वाळवी खायलाही आवडते. अस्वलाच्या एका जेवणात ४ हजार ते १० हजार वाळवींचाही समावेश असू शकतो. नाकपुड्या बंद करण्याची एक वेगळी शक्ती निसर्गाने अस्वलाला बहाल केली आहे. यामुळे वाळवी खाताना किंवा मधमाशीच्या पोळ्यातील मध पिताना, ते आपले नाक बंद करून घेते़बिबट्या : बिबट्या हा प्रतितास ५८ किलोमीटर वेगाने पळू शकतो. तर एका झेपेत सुमारे १९ फुटांपर्यंतचे अंतर पार करू शकतो. बिबट्याच्या अंगावर असलेल्या ठिपक्यांचा आकार हा गुलाबाच्या पाकळ्यांसारखा दिसतो.तरस : या प्राण्याचे मुख्य अन्न हे मृत प्राण्यांचे मांस आहे. तरसाचा जबडा हा अत्यंत मजबूत असून व दात हे अतिक्षण तीक्ष्ण असतात. तरस अनेकदा जो वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढतो, तो माणसाच्या हसण्याशी मिळताजुळता असतो.