लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंदाजित किंमत ८६,३०० कोटी रुपये इतकी आहे. हा द्रुतगती मार्ग सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येईल. या द्रुतगती मार्गामुळे, त्या मार्गावरील प्रमुख धार्मिक व तीर्थस्थळे जोडण्यात येतील. हा द्रुतगती मार्ग, केवळ प्रवासाचा वेळच कमी करणार नाही, तर या प्रदेशातील आर्थिक विकासालादेखील चालना देईल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात सांगितले.
राज्यपाल म्हणाले की, राज्य शासन शेतकरी हितास प्राधान्य देणारे निर्णय घेत आहे. सौरऊर्जा पंपांद्वारे शेतीकरिता पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ या अंतर्गत ३ लाख १२ हजार सौर पंप बसविले आहेत. पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना १० लाख सौर पंप पुरविण्यात येतील. सर्व कृषी वाहिन्या सौरऊर्जाकृत करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचे महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
देशांतर्गत स्थूल उत्पादनात महाराष्ट्राचे भरीव योगदान
देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये, ६३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सुमारे १५ लाख ७२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले. त्यामुळे १५ लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होतील.
प्रधानमंत्री सन्मान योजनेचे ९५ लाख शेतकरी लाभार्थी
‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ या अंतर्गत राज्यातील ९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांमार्फत तेल कंपन्यांना १२१ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे लक्ष्य पूर्ण करू. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही राज्यपालांनी म्हटले आहे.