Kunal Kamra Controversy: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याला पोलिसांच्या थर्ड डिग्रीची गरज आहे, असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिला आहे. त्याला टायरमध्ये घालून प्रसाद द्या असे पोलिसांना सांगू असेही शंभूराज देसाई म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबन गाणे तयार केले. ते गाणे व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
हेही वाचा >>"धन्यवाद, कुणाल कामरा"; मनसेच्या नेत्याने मानले आभार, शेअर केला 'तो' Video
ही घटना घडल्यापासून कुणाल कामराला कॉल करून धमक्या दिल्या जात आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने ही माहिती दिली. दरम्यान, आता कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनीही कुणाल कामराला धडा शिकवणार असा इशार दिला आहे.
शंभूराज देसाई कुणाल कामराबद्दल काय बोलले?
कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. कुणाल कामराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "पोलिसांची थर्ड डिग्री असते, त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामराबाबतीत करावा लागेल. आता आम्ही मंत्री जरी असलो, तरी आम्ही आधी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक आहोत."
कुणाल कामराला बाहेर काढून आपटायची तयारी -देसाई
"आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये संयम बाळगायला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. पण, शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो, तर हा कामरा कुठल्या गल्लीबोळात, बिळात जरी लपला असला, तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे", असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
"त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरमधील जी भूमिका असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या टायरामधील प्रसाद त्याला एकदा द्या, हे आता सांगावं लागेल", असे शंभूराज देसाई कुणाल कामराच्या गाण्यावर बोलताना म्हणाले.