मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून व्हाया समीर वानखडे देवेंद्र फडणवीसांपर्यंतनवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर, त्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंधही फडणवीसांनी चव्हाट्यावर आणले आहेत. त्यामुळे, हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे सांगत मलिक यांनी आज पुन्हा एकदा फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या, मलिक आणि फडणवीस असाच सामना रंगला आहे. त्यावरुन, आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहोत, असे नानांनी म्हटले. तसेच, राज्यातील राजकीय परिस्थिती अतिशय भयानक बनली आहे. नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत, ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नवाब मलिक यांनी एकमेकांविरुद्ध केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांवरील आरोपांची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. पण, भाजप नेते एस टी कर्मचा-यांची दिशाभूल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप एसटीची कर्मचा-यांचा वापर करत आहे असे पटोले म्हणाले.