मुंबई - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये बुधवारी राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा होणार आहे. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणाबाबत त्यांच्या सूचना मांडतील. तत्पूर्वी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. तसेच, जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही. आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसणे थोडसं कमीपणाच वाटतं. काय अडचण आहे मला कळत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्याचे तिसरे महिला धोरण दीर्घ काळापासून अडलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र, त्यास विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच सरकार कोसळले. हे धोरण महिला दिनी मंजूर व्हावे असा महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रयत्न होता; मात्र, त्यात काही सूचनांचा समावेश करावा, अशी विशेषत: महिला आमदारांची मागणी होती.
बळीराजा सरकारने उभारी द्यावी
६ तारखेपासून ते ९ तारखेपर्यंत हवामान बदलले जाईल, शेतकरी वर्गाचे हरभरा, मका, भाजीपाला, द्राक्षे, कांदा यासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. लोकांनी मला त्याबद्दल निवेदने दिली आहेत. सरकार काही मदत करते का आम्ही मागणी करणार आहोत. आधल्या दिवशी होळी असल्याने मान्यवर नेते, त्यामध्ये गुंतलेले होते. राज्यातील अनेक ठिकाणचा बळीराजा चिंतातूर झालेला आहे, अतिशय नाराज झालेला आहे. खचून गेलेला आहे, त्याला उभारी देण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले, त्याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला. यासाठी पीक विमा उतरवणे आणि NDRF कायदा बदलेले आहेत. त्याप्रमाणे मदत मिळाली पाहिजे. हे सरकारच काम सरकारने करावे, असेही पवार म्हणाले.