मुंबई : चलनाच्या समस्येचा फटका सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गालाही बसला आहे. मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांपासून घाऊक व्यापारी आणि हॉटेल चालकापासून वेटरपर्यंत सर्वांनाच नोट संक्रमण काळाचा फटका बसत आहे.जंक फूडपेक्षा स्टेशनजवळ, आॅफिसखाली असणाऱ्या अण्णाच्या एक प्लेट इडली-मेंदुवड्याचा भरपेट नाश्ता अगदी १२ रुपयांत मिळत असल्याने त्याला अनेक जण पसंती देत आहेत. म्हणूनच सकाळी ६ वाजल्यापासून इडलीवाल्या अण्णाच्या हाती असलेल्या भोंग्याचा आवाज गल्लीबोळांमध्ये ऐकायला मिळत असतो. असे असले तरी इडलीचे मोठे भांडे घेऊन फिरणाऱ्या अण्णांचा धंदाही गेल्या काही दिवसांपासून मंदावला आहे. त्यात १२ रुपयांसाठी सुटे पैसे देताना विक्रेत्यांची अडचण होत आहे. ग्राहक रोडावल्याने तयार केलेला माल संपवायचा तरी कसा? यासोबतच धंदा बंद केल्यास पुन्हा लोकांची विश्वासार्हता मिळवायची कशी? अशा द्विधा मन:स्थितीत इडलीविक्रेते आहेत.मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या हॉटेलचीही तीच अवस्था आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता बहुतेक हॉटेलांतील गर्दी ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे वरळीतील हॉटेल चालक जयकर शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले की, पहिल्या चार दिवसांत धंदा खूपच कमी झाला होता. रविवारी हॉटेल हाऊसफुल असायचे, मात्र या रविवारी हॉटेलात म्हणावी तितकी गर्दी नव्हती. (प्रतिनिधी)
मुंबापुरीतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
By admin | Published: November 17, 2016 6:13 AM