दादरच्या मंडईवर संक्रांत
By Admin | Published: February 5, 2016 03:01 AM2016-02-05T03:01:54+5:302016-02-05T03:01:54+5:30
दादरच्या प्लाझा सिनेमाजवळील महापालिकेच्या प्रसिद्ध क्रांतिसिंह नाना पाटील मंडईवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. सेनापती बापट मार्ग आणि न.चिं. केळ
मुंबई : दादरच्या प्लाझा सिनेमाजवळील महापालिकेच्या प्रसिद्ध क्रांतिसिंह नाना पाटील मंडईवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. सेनापती बापट मार्ग आणि न.चिं. केळकर मार्गाला जोडण्यासाठी महापालिकेने नवीन रस्त्याचा घाट घातला असून हा रस्ता थेट मंडईतूनच जाणार असल्यामुळे येथील भाजीपाला विके्रते संकटात सापडले आहेत.
दादर पश्चिमेला प्लाझा सिनेमाला लागून असणाऱ्या नाना पाटील मंडईत तब्बल ३२२ गाळेधारक आणि शेकडो किरकोळ भाजीपाला विक्रेते आहेत. चाळीस वर्षे जुनी असणारी ही मंडई मध्यवर्ती भागात आहे. तसेच शेजारीच असणाऱ्या दादर स्थानकावरून मध्य व पश्चिम रेल्वेची सोय असल्याने या मंडईतून दररोज मुंबईच्या कानाकोपऱ्यात घाऊक पद्धतीने भाजीपाला पाठविला जातो. मात्र, आता याच मंडईतून नवा रस्ता बनविण्याचा घाट घातला जात असून येथील गाळेधारक व किरकोळ विक्रेते संकटात सापडले आहेत. सेनापती बापट मार्ग आणि न.चिं. केळकर मार्गाला जोडण्यासाठी ९.१४ मीटरचा नवीन रस्ता बनविण्याचा प्रस्ताव आहे. सदर नवीन रस्त्यासाठी नाना पाटील मंडई आणि त्याला लागून असणाऱ्या प्लाझा सिनेमाचा काही भाग संपादित करावा लागणार आहे.
नवीन रस्त्यामुळे तब्बल ६२ गाळेधारकांना आपली जागा सोडावी लागणार आहे. या ६२ गाळेधारकांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप कोणतीच स्पष्ट कल्पना प्रशासनाने दिली नसल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली आहे. मंडईतील गाळे हटवून तसेच प्लाझा सिनेमाचा काही भाग संपादित करून नवा रस्ता बनविण्याची गरज नाही. परिसरातील स्थानिकांनीही अशा प्रकारे रस्ता व्हावा, अशी मागणी लावून धरलेली नाही. मात्र, काही बिल्डरांनी त्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप भाजीपाला व्यापारी मंडळाचे शंकरराव पाटील यांनी केला आहे.
न.चिं. केळकर मार्गावरील प्लाझा जंक्शन येथे शिवसेना भवन, कबुतरखाना आणि दादर टीटीकडून वाहनांचा मोठा लोंढा येतो. त्यामुळे या परिसरात कायम वाहतूककोंडी असते. त्यात नवीन रस्त्यामुळे आणखी भर पडणार आहे. शिवाय नवीन रस्ता जेथे न.चिं. केळकर मार्गाला जोडला जाणार आहे तो भाग तुलनेने चिंचोळा आहे. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनणार आहे.