मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यान संबंध सुधारण्यासाठी मुंबई आणि कराचीदरम्यान ‘शांती बोट’ चालविणार असल्याची घोषणा आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ)चे अध्यक्ष सुधींद्र कुळकर्णी यांनी बुधवारी केली. सुधींद्र कुळकर्णी यांच्या ओआरएफने मुंबईत पाकिस्तानी पत्रकार आणि डॉन या वृत्तपत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद हरून यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना कुळकर्णी म्हणाले की, पाकिस्तानी कलाकार अथवा कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीचे कार्यक्रम मुंबई, महाराष्ट्र आणि भारतात होऊ देणार नाही, अशी धमकी शिवसेनेने दिली. त्यामुळे पाकिस्तानातील महत्त्वाच्या व्यक्तींना भारतात आमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेला उत्तर देऊ, असे कुळकर्णी म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी एकदा पाकिस्तानला भेट द्यावी, तिथल्या लोकांशी संवाद साधावा तेव्हाच तिथल्या लोकांच्या भावना कळतील, असा टोला कुळकर्णी यांनी ठाकरे यांना लगावला. हजारो वर्षांच्या इतिहासाने दोन्ही देश सांधले गेले आहेत. घुसखोरीसारख्या घटनांनी हे संबंध बिघडणार नाहीत. दोन्ही देशांतील राज्यकर्त्यांनी परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे.त्यामुळे आता सामान्य जनतेनेच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे हरून म्हणाले. शिवसेनेपासून भारतातील वातावरणाबद्दल गप्पा मारणाऱ्या हमीद हरून यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील वास्तव्याबाबत विचारले असता थेट उत्तर देणे टाळले. (प्रतिनिधी)
मुंबई-कराचीदरम्यान चालविणार ‘शांती बोट’!
By admin | Published: December 24, 2015 2:03 AM