मुंबई: शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या व्हिडिओप्रकरणावरुन पोलिसांनी कारवाई सुरू केली असून दहिसर पोलिसांनी एका तरुणाला अटकही केली. तसेच विविध तरुणांना या व्हिडिओसंबंधित पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र शीतल म्हात्रेप्रमाणे नृत्यांगना फेम गौतमी पाटील हिच्याही व्हिडिओचा तपास करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे.
शरद कोळी म्हणाले की, गौतमी पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मग ती तुमची बहीण नाही का? शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली. मग गौतमी तुमच्या भगिनी नाहीत का? यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?, असा सवालही शरद कोळी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती, तसंच याप्रकरणी राज्य महिला आयोगाने दाखल घेतली होती.
शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवरुन विधानसभेत गोंधळ
सदर व्हायरल व्हिडिओचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहेत. त्यावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी झाली. या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी सभेत केला. मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले. शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला.