Sharad Pawar On Maharashtra Flood: राज्यातील पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पूरग्रस्त भागांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती पवार यांनी दिली.
पूरग्रस्त भागातील कुटुंबांना औषधं, लहान मुलांसाठी बिस्कीटं, भांडी, मास्क व इतर महत्वाच्या वस्तू असं १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. यासोबत पूरग्रस्त भागांमध्ये २५० डॉक्टरांचं पथक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी इतकी असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना तातडीनं मदत मिळणं गरजेचं आहे. काल राज्य सरकारनं काही मदत जाहीर केली आहे. ते त्यांच्या कार्यक्रमानुसार नक्कीच मदत करतील, असं पवार म्हणाले.
नुकसानग्रस्त भागांचे दौरे टाळाराजकीय नेत्यांकडून होणारे पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याचं आवाहन देखील यावेळी पवार यांनी केलं. "माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे. आता शासकीय यंत्रणा पूनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावेत. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली गेली ते दहा दिवसांनंतर आले. त्यामुळे कोणत्याही नेत्यंनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रण फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही", असं पवार म्हणाले.
"दौरे होत आहेतत त्याने धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळे यंत्रणेला त्रास होतो", असंही ते पुढे म्हणाले.