मुंबई : अखंड कार्यमग्नतेचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार. आता जवळपास १८ वर्षे झाली मी त्यांच्यासोबत काम करतोय. पण, इतक्या वर्षांत त्यांच्या सामाजिक अथवा राजकीय कार्यात कधी खंड पडल्याचे मी पाहिलेले नाही. शरद पवार साहेबांचे वय आता ८० झाले, त्यांची प्रकृती बरी नव्हती. कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी त्यांनी यशस्वी मुकाबला केला. मध्यंतरी पडल्यामुळे त्यांच्या पायालाही दुखापत झाली होती. परंतु, या सर्व बाबींवर मात करत त्यांचा दिनक्रम ते कायम ठेवतात. अगदी रुग्णालयात असले तरी जी कामे व्हायला हवीत त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा असतो. हा आमच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, पक्षातील तरुण नेत्यांसाठी आदर्श वस्तुपाठच आहे. सकाळी ८ वाजल्यापासून लोकांच्या गाठीभेटींचा त्यांचा दिनक्रम सुरू होतो. प्रत्येकाचे म्हणणे ऎकून घ्यायचे. त्याबाबत जे करणे आवश्यक आहे ते तातडीने मार्गी लावायचे, हा त्यांचा मोठा गुण आहे.
शरद पवारांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सर्व घटकांशी असलेला त्यांचा सुसंवाद, हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मीळ गुण आहे. राजकीय विरोधक, वेगळ्या विचारांच्या, पक्षाच्या लोकांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध असे आहेत की विरोधकही प्रसंगी त्यांच्यासाठी उभे राहतील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांबाबत आदराचेच उद्गार काढले. एनडीए विरुद्ध यूपीएचा इतका संघर्ष मागच्या काळात झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे उद्गार विशेष ठरतात. पवारांचे व्यक्तिमत्त्व, कार्य, त्यांचे चारित्र्यच असे आहे की लोक त्यांच्याभोवती गुंफले जातात. संसदेतही हा गोतावळा आम्ही प्रकर्षाने अनुभवला आहे. राज्यसभेत ते पुढच्या बाकावर आणि मागे आम्ही बसायचो. अनेक वेळा या ना त्या कारणाने सभागृहाचे कामकाज थोड्या कालावधीसाठी तहकूब व्हायचे. अशा वेळी डावे, उजवे, मागचे सगळे नेते पवारांच्या आसनाभोवती गोळा व्हायचे. अनेकदा तर सत्ताधारी बाकांवरील अनेक मंत्रीसुद्धा त्यांच्या आसनापाशी जमत आणि चर्चा झडत. आम्ही पाहायचो की, प्रत्येकाचे प्रश्न सोडवायला एकच माणूस लागतो, ते म्हणजे आमचे पवार साहेब. अशा या आमच्या नेत्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, अशीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे.