Join us

शरद पवार अभीष्टचिंतन :- ‘टायमिंग - आमदार ॲड. आशिष शेलार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

मुंबई : एकाच माणसाला असंख्य गोष्टींंची आवड असावी असे एकाद्या व्यक्तीकडे पाहायला मिळते. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे ...

मुंबई : एकाच माणसाला असंख्य गोष्टींंची आवड असावी असे एकाद्या व्यक्तीकडे पाहायला मिळते. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार!

राजकारणासोबत नाटक, गीत-संगीत, साहित्य, कला, क्रीडा या विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. असा क्रिकेटचा कोणता सामना नसेल जो त्यांना ज्ञात नाही, असे होत नाही. तसेच महाराष्ट्रातील साहित्य संमेलन व संमेलनांचे अध्यक्ष, त्यांची भाषणे याबाबतही ते भरभरून बोलू शकतात.

मराठी, हिंदी, इंग्रजीमधील नामवंत साहित्यिकांपासून अलीकडे नव्याने लिहिणाऱ्या लेखक, कवींच्या साहित्यापर्यंत त्यांचे वाचन आहे. त्यांना भेटायला गेल्यानंतर नवनवीन पुस्तकांची माहिती मिळत राहते.

एका भेटीत मी त्यांना म्हटले की, पुस्तकांचे पहिले गाव सुरू होताच भिलारला तुम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी भेट दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले. त्यावर ते म्हणाले, हो. काही पुस्तकेसुद्धा दोन दिवसांत मी पाठवून देणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर टीमसह आम्ही मा. शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्या वेळी पूनम राऊत हिने आपल्याकडे मुंबईत घर नाही. आहे ते खूप लहान आहे, अशी खंत व्यक्त केली. याबाबत सरकारला तिने विनंतीही केली. या भेटीनंतर तीन दिवसांत मला एकदा पुण्याहून पवार साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, मी एका विकासकासोबत आहे. पूनम राऊत राहते त्या कांदिवलीमध्ये त्यांचे बांधकाम सुरू आहे. मी त्या विकासकाशी चर्चा केली आहे. काही गोष्टींंची तरतूद आपण करू. तुम्ही पुढील समन्वय साधा. महिनाभरात घर तिला मिळेल, असे प्रयत्न करू.

अशा पद्धतीने संवेदनशीलपणे पाहणारे त्यांचे नेतृत्व आहे. अशा अनेक घटना सांगता येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे नेतृत्व आज मा. पवार यांचा आदराने उल्लेख करतात. ते बारामतीला जातात त्यावर अनेक गोष्टींंचे महत्त्व विशद होतेच.

संघर्षातून पुढे आलेले शरद पवार यांचे नेतृत्व आहे. आजही त्यांचा कामाचा धडाका पाहिला की आश्चर्यचकित व्हायला होते. एवढे सगळे व्याप, राजकारण, समाजकारण, दौरे, भेटी, वाचन सगळे सांभाळणारे पवारसाहेब एवढ्या सगळ्यात वेळेच्या बाबतीतही काटेकोर आहेत.

कोणत्याही कार्यक्रमाला त्यांनी दिलेल्या वेळेवरच ते उपस्थितीत होतात. तसेच रोजच्या भेटीगाठीच्या शेड्यूलमध्ये त्यांनी नियोजित केलेल्या वेळेतच त्यांची भेट होते व ती संपते. कदाचित त्यावरून तर त्यांनी राष्ट्रवादीला घड्याळाचे चिन्ह दिले नाही ना? असे वाटते. पण त्यांचा हा गुण त्यांच्या पक्षात किती जणांनी आत्मसात केला, हा संशोधनाचा विषय असू शकतो.

वेळेचे पक्के असणाऱ्या मा. शरद पवार यांच्याकडे राजकारणात ही वेळ साधण्याची कला विलक्षण आहे. राजकारणात टायमिंगला महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांनी टायमिंग साधलेपण आणि अनेकवेळा अनेकांचे चुकवलेपण! असो.

ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना!