मुंबई : मृणालताई गोऱ्हे, अहिल्या रांगणे, मधू दंडवते यांच्यापासून माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्यापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. राजकारण, समाजकारणात अनेक नेत्यांना आपण पाहत असतो. या सर्वात शरद पवार साहेबांचे वेगळेपण अथवा वैशिष्ट्य असेल, तर ते म्हणजे त्यांच्या कामातील सातत्य. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ते कामात असतात. आपल्याकडील सत्ता, अधिकारांच्या माध्यमातून लोकांची कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हाती असलेल्या सत्तेतून शेतकरी, महिला, दलित आणि गोरगरिबांची कामे झाली पाहिजेत. लोकहिताचे निर्णय व्हायला हवेत, हीच त्यांची भूमिका असते. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम मार्गी कसे लागेल, हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. उद्या, परवा या किंवा बघू, असा प्रकार त्यांच्या स्वभावात नाही. कामे कसे होईल, याच पद्धतीने त्यांचा विचार अथवा कृती असते. हे त्यांचे अगदी खास म्हणावे असे वैशिष्ट आहे. आपल्याकडील सत्ता, अधिकार आणि अनुभवाच्या जोरावर काम पूर्णत्वास नेण्यात त्यांची हातोटी आहे. ही त्यांची एक सवयच बनली आहे. लाॅकडाऊनच्या काळात किंवा मागे पायाला इजा झाली होती, तेव्हाही त्यांची ही सवय कायम राहिली. बेड-रिडन असतानाही ते लोकांची कामे करतच होते. खऱ्या अर्थाने एक जाणकार लोकनेता ही बिरूदावली त्यांनी शोभते. पन्नास वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत पवारांच्या कामातील सातत्याने कायम राहिले, त्याशिवाय कदाचित त्यांना चैनही पडत नसावे.
पवार, कुठेही जाऊ शकतात, असे विधान राजकारणात अनेकदा केले जाते. मात्र, पवारांनी कायम संविधानाला आधार मानूनच वाटचाल केली आहे. लोककल्याणाची भावना आणि दृष्टी समोर ठेऊनच ते काम करत राहिले आहेत. निवडणुका येतात-जातात, पण योग्य व्यक्तीकडे उच्च पदाची जबाबदारी असेल, तरच लोककल्याणाची कामे होतात. उच्च पद ही पवारांची गरज नाही, तर आपल्या अनुभव, कर्तबगारीने पदाची महत्ता वाढविणारे असे पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व आहे.