Sharad Pawar: शरद पवारांचे कार्यकर्त्यांपुढे महत्त्वाचे संकेत; म्हणाले, “दोन दिवस द्या, हा निर्णय झाला की...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 03:45 PM2023-05-04T15:45:52+5:302023-05-04T15:46:55+5:30

Sharad Pawar: निवृत्ती मागे घेण्यासाठी आग्रही असलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी संबोधित करून आश्वस्त केले.

sharad pawar address ncp workers at mumbai regarding retirement decision | Sharad Pawar: शरद पवारांचे कार्यकर्त्यांपुढे महत्त्वाचे संकेत; म्हणाले, “दोन दिवस द्या, हा निर्णय झाला की...”

Sharad Pawar: शरद पवारांचे कार्यकर्त्यांपुढे महत्त्वाचे संकेत; म्हणाले, “दोन दिवस द्या, हा निर्णय झाला की...”

googlenewsNext

Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यापासून राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आंदोलन-उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींकडून शरद पवार यांची मनधरणी करण्याचा आग्रही प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील व्हाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. 

व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. समितीमधील सदस्य शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होत असून, शरद पवारांसाठी घोषणाबाजीही करत आहेत. एका कार्यकर्त्याने तर रक्ताने पत्र लिहिले. या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले असताना शरद पवार कार्यकर्त्यांसमोर आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काही सूचक संकेत दिले. 

कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा आदर करतो

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांकडे दुर्लक्ष करत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. या भावनांचा आदर करतो. मात्र, जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला. उद्या पक्षाचे काम कसे चालावे, त्यातून नवीन नेतृत्व इतरांनी करावे हा यामागचा आमचा हेतू होता. ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकार्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी अशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी हो म्हणाला नसता. त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही. पण यामागचा हेतू काय होता, हे तुम्हाला सांगितला, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही

आता हा जो निर्णय घेतला, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी त्यांना बोलायचं आहे. माझी आणि त्यांची भेट संध्याकाळी होईल, ती झाल्यानंतर तुमच्या सर्वांची जी भावना आहे, ती नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरुन आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय एक ते दोन दिवसांत करण्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढचे आता सांगतो. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, हे आश्वासन मी तुम्हाला देतो, या सूचक शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. 

दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांच्या भूमिकेचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: sharad pawar address ncp workers at mumbai regarding retirement decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.