मुंबई – इंडिया आघाडीच्या पक्षांची मुंबईत २ दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते मुंबईत दाखल होत आहे. या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीकडे आहे. ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व तयारी झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली होती. या बैठकीत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी जोक मारला त्यावर शरद पवारांनीही हसून दाद दिली.
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, इंडियाची बैठक आहे, इंडियाच्या विषयावर बोलले पाहिजे असं उद्धव ठाकरे तुम्ही म्हणाला. परंतु सामनातून सातत्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. हा विसंवाद का आहे? असा प्रश्न विचारला तेव्हा व्यासपीठावरील उपस्थित सगळे हसायला लागले. त्यात उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडे बोट दाखवले. नाना पटोले राऊतांकडे बघून हसू लागले. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे वैशिष्टे आहे, आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. भाजपासोबत असताना भाजपावरही टीका करत होतो असं म्हणत उद्धव ठाकरेंना हसू आवरले नाही.
तर तुम्ही तुमच्या मीडियातून टीका केली म्हणून आम्ही काम करायचे थांबायचे का? तुम्ही तुमचे काम करा आणि आम्ही आमचे काम करू असं उत्तर शरद पवारांनी दिले. त्यावर लगेच पत्रकारांनी शिवसेनेचे नेते मागणी करतायेत, उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे. त्यावर उद्धव ठाकरेंनी “जातो उद्या, शपथ घेतो मी” असा विनोद केला. त्यावर पत्रकार परिषदेत हशा पिकला.
दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हुकुमशाही आणि जुमलेबाजीच्या विरोधात आम्ही आहोत. भारतमातेच्या हातापायात पुन्हा कोणत्याही हुकुमशाहाला बेड्या घालायला देणार नाही. सगळ्य महिलांना सुरक्षित वाटावं असं सरकार आणण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झाला आहे. ज्याक्षणी आमचं सरकार येईल त्याक्षणी आम्ही त्यांचे पाश तोडून मुंबईची आणि इतर राज्यांची स्वायत्तता अबाधित ठेवू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.