Join us

गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत शरद पवारांसह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:07 AM

- परमबीर सिंग यांचा पत्रात दावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल ...

- परमबीर सिंग यांचा पत्रात दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती, असा दावा पत्रात केला आहे.

आयुक्तपदावरून हटविण्यात आल्याने अस्वस्थ असलेल्या सिंग यांनी जवळपास आठ पानांचे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यांची स्वाक्षरी नसलेल्या या पत्रात २३ मुद्दे मांडले आहेत. त्यानुसार, १८ मार्चला ‘लोकमत’च्या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीत अँटिलिया प्रकरणाच्या तपासात आयुक्तांकडून गंभीर चुका झाल्याने त्यांना हलविण्यात आल्याचे म्हटले होते. वास्तविक, हे असत्य आहे.

मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलिया प्रकरणाची पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले होते. इतकेच नाहीतर, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरेतर ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले. सचिन वाझे हे गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री देशमुख यांनी कित्येक वेळेस त्यांना त्यांच्या ज्ञानेश्वर निवासस्थानी बोलावून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले होते. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलावून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली होती. त्या वेळेस देशमुख यांचे वैयक्तिक सचिव पलांडे आणि एक - दोन घरातले कर्मचारीही हजर होते. एवढेच नाहीतर, शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही देशमुखांनी सांगितले. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले होते की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केले तर महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी सहज उपलब्ध होतील. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने गोळा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या कार्यालयात आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितले. मला त्याचा धक्का बसला. खरेतर, मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करीत होतो.

------------

केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतून वाचण्यासाठी लेटर बॉम्ब ?

अँटिलिया प्रकरणाच्या तपासात परमबीर सिंग यांच्याकडे एनआयए लवकरच चौकशी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतून आपल्यावर कोणतेही बालंट येऊ नये, यासाठी त्यांनी हे गंभीर आरोप केले असावेत, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

सचिन वाझे यांना देशमुख यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्चमध्ये बोलावल्याचे पत्रात नमूद केले आहे. वास्तविक, ते गेल्या वर्षी जून महिन्यात गुन्हे गुप्तवार्ता विभागात रुजू झाले. तर तेव्हापासूनचे ‘कलेक्शन’ कोण करीत होते? आणि परमबीर सिंग यांनी त्यांची पदावरून उचलबांगडी झाल्यावरच का पत्र लिहिले? त्या वेळीच वाझे यांच्या वक्तव्याची नोंद स्टेशन डायरीत का केली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

--------

पत्रामध्ये सर्व नमूद केले आहे - परमबीर सिंग

पत्राबाबत परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. पत्रात आपण सर्व नमूद केले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना ई-मेल केला आहे. त्याची प्रत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना देण्यात येईल, असे सांगितले.

---------------

कोण आहेत परमबीर सिंग

होमगार्डचे महासमादेशक म्हणून दोन दिवसांपूर्वी नियुक्ती झालेले परमबीर सिंग हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला त्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. त्याआधी ते राज्याचे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त तसेच एटीएससह विविध ठिकाणी काम केले आहे.

---------