Join us

शरद पवार, सुप्रिया सुळेंनी याचिकाकर्त्यांचे आरोप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लवासा प्रकल्पाप्रकरणी याचिकाकर्त्यांनी आपल्यावर कोणत्याही कागदपत्रांशिवाय निराधार आरोप केले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लवासा प्रकल्पाप्रकरणी याचिकाकर्त्यांनी आपल्यावर कोणत्याही कागदपत्रांशिवाय निराधार आरोप केले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च न्यायालयात सर्व आरोप फेटाळले.

याचिकाकर्ते केवळ प्रसिद्धीसाठी वारंवार आपल्याविरोधात याचिका दाखल करत आहेत, असा युक्तिवाद शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रवि कदम यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे केला.

लवासा प्रकल्पाला कायदेशीर संमती मिळावी, यासाठी बॉम्बे टेनेन्सी ॲॅण्ड ॲग्रिकल्चर लॅण्ड ॲक्टमध्ये २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि तो कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा घाट सरकारने घातला. केवळ शरद पवारांसाठीच कायद्यात सुधारणा करण्यात आली, असा आरोप करत व्यवसायाने वकील असलेले नानासाहेब जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

शुक्रवारच्या सुनावणीत कदम यांनी न्यायालयाला सांगितले की, हा प्रकल्प हाती घेणाऱ्या कंपनीचे मालक अजित गुलाबचंद यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले नाही. याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पाशी निगडित असलेल्या व्यक्तींना किंवा कंपनीला प्रतिवादी केले नाही. मात्र, ज्यांचा या प्रकल्पाशी दुरान्वयाने संबंध नाही त्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी यापूर्वीही याचसंदर्भात याचिका केली होती. परंतु, त्यांनी ती मागे घेतली, असे कदम यांनी न्यायालयाला सांगितले.

पुण्यात हिल स्टेशनवर उभारण्यात आलेला लवासा प्रकल्प अनेक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चर्चेत राहिला. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविण्यात आल्या. शरद पवार कुटुंबीयांचे हितसंबंध असल्याने व सुप्रिया सुळे यांच्या कंपनीने या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे या प्रकल्पाला भूखंड मिळवून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यावेळी जलसंपदामंत्री होते. अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करून पर्यावरण नियम व अन्य नियम धाब्यावर बसवून या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प बेकायदेशीर ठरवून रद्द करावा व सध्या या प्रकल्पाच्या लिलावाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

हा प्रकल्प लिलावात काढला तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे या प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.