मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेले काही दिवस शेतकरीआंदोलन सुरु आहे. आतापर्यंत केंद्र सरकार व शेतकरी यांच्यात आठ ते दहा बैठक झाल्या आहेत . मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही. यावरून देशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलंय. मात्र, शरद पवारांचा सहभाग म्हणजे ढोंगीपणा असल्याच विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
मुंबईतील आझाद मैदानात येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत असतात. त्याच्याच एक दिवस आधी शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यावरुन, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठीची पवारांची ही खेळी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मुंबईतील आंदोलनातील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सहभागाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, हा निव्वळ ढोंगीपणा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात 2006 साली जो कायदा सरकारने तयार केला, तो कायदा केंद्राने तयार केल्यानंतर त्याविरुद्ध आंदोलन करत आहेत. केवळ बहती गंगा मे हात धुण्याचं हे काम आहे. महाराष्ट्रात या तीन कृषी कायद्याच्या संदर्भात कुठेही आंदोलन झालेलं नाही. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्रातही त्यांनी सांगितलंय की, कशा रितीने 17 टक्क्यांचा भार हा शेतकऱ्यांवर पडतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना कसं नियमनमुक्त केलं पाहिजे. काँग्रेस तर सर्वात मोठा ढोंगी पक्ष आहे. काँग्रेसने 2019 च्या जाहिरनाम्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द करा असं म्हटलंय, याची आठवणही फडणवीस यांनी करुन दिली.
शरद पवारांचा सहभाग
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार हे २५ जानेवारी रोजी आझाद मैदानात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.