Join us

शरद पवार ठाम, ठरल्याप्रमाणे 'ईडी'चा पाहुणचार घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 6:18 PM

'ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये'

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच शरद पवार यांनी  काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

याचबरोबर, ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन आवाहन केले आहे. 

दरम्यान, काल पत्रकार परिषद घेऊन 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता मी ईडी कार्यालयात हजर होईन. जो काही पाहुणचार असेल तो स्वीकारणार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. तसेच, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. आम्हाला दिल्लीसमोर झुकणे माहिती नाही. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल प्रतिक्रिया दिली. याशिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई कशी? असे म्हणत शरद पवार यांनी सरकार आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.  

महाराष्ट्र राज्य सहकारी  बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता ईडीने सुद्धा या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालयविधानसभा निवडणूक 2019