मुंबई-
भाजपा आणि शिंदे गटाकडून राज्यातील ग्रामपंचायतीत मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत निकालाची सविस्तर माहिती दिली. यात महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. ते मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
'लवकर चौकशी करा, आम्ही तयार आहोत'; पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
शरद पवारांनी यावेळी पत्राचाळ घोटाळ्यावरुन गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबतही स्पष्टीकरण दिलं. "पत्राचाळी संदर्भात जी काही बैठक झाली त्याचा तपशील सर्व नमूद आहे. तत्कालीन सचिवांची त्यावर सही आहे आणि त्याचा इतिवृतांत तुम्हाला मी आता पत्रकार परिषद झाली की सर्वांना देतो. तरीही काही चौकशी करायची असेल तर ती लवकरात लवकर करा आणि सगळं खोटं ठरलं तर मग काय?", असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. याबाबत विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला. "हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?", अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंवर खोचक टोला लगावला.
राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. याबाबतही एका पत्रकारानं राज ठाकरेंचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येणं यावर एक प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार यांनी मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसं बघत नाही, असं म्हणून एकूणच राज ठाकरेंच्या दौऱ्याची आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांच्या कार्यक्रमावर टीका केली.
देशात भाजपाला वातावरण अनुकूल नाहीदेशात आता भाजपाला अनुकूल वातावरण राहिलेलं नाही. नागरिकांमध्ये खूप असंतोष आहे. याची कल्पना भाजपाला आहे त्यामुळेच देशात विविध लोकसभा मतदार संघांची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांना निश्चित करुन दिली जात आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी निर्मला सीतारामण यांचं स्वागत केलं आहे. पण याआधीही पंतप्रधानांसह इतर बडे नेते बारामतीत येऊन गेले आहेत. याची आठवण करुन देत भाजपाच्या मिशन बारामतीचा काही परिणाम होणार नसल्याचं पवारांनी सांगितलं.