“गुणरत्न सदावर्तेंनी सर्व काही केलं, हल्ल्यात आमचा रोल नाही”; दोन आरोपींनी दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:46 PM2022-04-16T17:46:46+5:302022-04-16T17:52:36+5:30
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असून, सातारानंतर पुढे पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे. यातच आता या आंदोलनात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या दोन जणांना शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे सदावर्ते सूत्रधार असल्याची कबुली दिली आहे.
शरद पवारांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवले आहे. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून, सर्व काही सदावर्तेंनी केले, अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.
आम्ही आरोपी नाही, सदावर्ते यांनी सर्व काही केले
या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचे आहे, अशी विनंती केली होती. न्यायालयाला काही सांगायचे आहे, असे ते म्हणत होते. या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळे सदावर्ते यांनी केल्याचे अभिषेक पाटील म्हणाला. तशाच प्रकारची कबुली चंद्रकांत सुर्यवंशी यांनेही दिली. तसेच शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल शासनास पाठवला आहे.